बिले थकवणाऱ्या आठ ग्रामपंचायतींचे पाणी तोडले, एमआयडीसीचा कारवाईचा बडगा
उरण तालुक्यातील 20 ग्रामपंचायती आणि नगर परिषदेची पाणी बिलापोटी एमआयडीसीचे तब्बल 76 कोटी थकले आहेत. त्यामुळे एमआयडीसीने ऐन उन्हाळ्यात 8 ग्रामपंचायतींचे पाणी तोडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना उन्हाचे चटके सहन करत हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. थकबाकी भरली तरच पाणी मिळेल असा इशारा एमआयडीसीने दिल्याने ग्रामस्थांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणी बिलापोटी 34 कोटी 11 लाख 87 हजार 141 तर उरण नगर परिषदेवर 42 कोटी 57 लाख 5 हजार 232 रुपये असे एकूण एमआयडीसीचे 76 कोटी 14 लाख 13 हजार 870 रुपये थकबाकी असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता ज्ञानदेव सोनावणे यांनी दिली. तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. ग्रामपंचायतींकडून पाण्याची बिले भरायास मात्र दिरंगाई केली जात आहे.
पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्रामपंचायती
दिघोडे – 1 कोटी 32 लाख, दादरपाडा – 22 लाख 15 हजार, वेकवी – 1 कोटी 24 लाख, पागोटे – 6 लाख 24 हजार, चिरनेर – 3 कोटी 28 लाख, रांजणपाडा – 5 लाख 70 हजार, नवघर – 24 लाख 12 हजार, खोपटा – 11 लाख 18 हजार या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
Comments are closed.