इराणचा UAE वर सलग दुसऱ्या दिवशी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला, एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय
मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला असून इराणने संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) सलग दुसऱ्या दिवशी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये खळबळ उडाली असून यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence Systems) पूर्णपणे सक्रिय असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सना यूएईच्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेने हवेतच यशस्वीरित्या रोखले. देशाच्या विविध भागांत स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले असून, हे आवाज क्षेपणास्त्रे निकामी करताना झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या हल्ल्यांनंतर यूएईमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याआधी सोमवारी झालेल्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यात फुजैराह तेल क्षेत्रात आग लागली होती. ज्यामध्ये तीन हिंदुस्थानी नागरिकांसह काही जण जखमी झाले होते. त्यानंतर २४ तासांच्या आतच इराणने पुन्हा एकदा हल्ला चढवल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Comments are closed.