धावत्या लोकलमध्ये दोन प्रवासी भिडले, मारामारीचा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चर्चगेट-विरार जलद लोकलमध्ये गुरुवारी रात्री थरारक घटना घडली. दरवाजावर उभे राहण्याच्या वादातून दोन प्रवासी एकमेकांना भिडले. धावत्या लोकलमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

गुरुवारी रात्री साडेदहा वाजता चर्चगेटहून जलद लोकल विरारच्या दिशेने निघाली होती. ग्रॅण्टरोड ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान  दोन प्रवाशांमध्ये दरवाजावर उभे राहण्यावरून वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. दोघेही एकमेकांवर तुटून पडले. त्याचवेळी एका प्रवाशाने मोबाईलमध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी चित्रीत केले. मुंबई सेंट्रल स्थानक जवळ येताच त्यातला एक जण धावत्या लोकलमधून खाली पडतोय असे दिसते. त्यामुळे हा हाणामारीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात होते. मात्र वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे नंतर समोर आले. दोघांपैकी कोणीही लोकलमधून खाली पडला नाही. स्थानकावरील सीसीटीव्हीनुसार दोघेही त्या डब्यातून खाली उतरले आणि वेगवेगळ्या डब्यात बसून पुढील प्रवासाला निघून गेले. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. त्या दोघांकडून किंवा अन्य प्रवाशांकडून कुठलीही तक्रार आलेली नसल्याचे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed.