सेवानिवृत्त होण्यासाठी एमआयजी -21 विमान

गतकाळात होती भारताच्या वायुदलाचा मुख्य भाग

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

स्वतंत्र भारताच्या इतिहासात अनेक सशस्त्र संघर्ष आणि युद्धांमध्ये यशस्वी सहभाग घेतलेली आणि गतकाळात भारतीय वायुदलाचा मुख्य आधार असलेली ‘मिग-21’ ही युद्धविमाने निवृत्त केली जातील, अशी घोषणा संरक्षण विभागाने केली आहे. या विमानांची निवृत्ती सप्टेंबरमध्ये केली जाणार आहे. जुन्या तंत्रज्ञानाची ही विमाने आता कालबाह्या झाल्याने त्यांचा उपयोग थांबविण्यात येईल.

ही विमाने ‘मिग-21’ बायसन या नावाने परिचित होती. ती रशियन बनावटीची असून मिग मालिकेत सर्वात प्रथम त्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर, मिग-23. मिग-25, मिग-27 आणि मिग-29 अशा त्यांच्या अधिकाधिक सुधारित आवृत्त्या निर्माण करण्यात आल्या आहेत. या सर्व आवृत्त्यांची विमाने भारताच्या वायुदलात आहेत. आता ‘मिग-21’ विमानांचे स्थान पुष्कळ अंशी भारतीय बनावटीची असणारी ‘तेजस’ ही विमाने घेणार आहेत.

निवृत्तीसाठी विलंब

ही विमाने तीन वर्षांपूर्वीच निवृत्त केली जाणार होती. तथापि, तेजस विमानांच्या उत्पादनासाठी विलंब लागल्याने या विमानांचा सेवाकाळ वाढविण्यात आला होता. 2019 मध्ये भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये या विमानांनी भाग घेतला होता. भारताचा विमानचालक कॅप्टन अभिनंदन वर्धमान याने याच विमानाच्या साहाय्याने पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळविलेल्या आणि अत्याधुनिक समजल्या जाणाऱ्या एफ-16 विमानाचा खात्मा केला होता.

केवळ बायसन आवृत्ती सध्या सेवारत

मिग-21 विमानांच्या निवृत्तीची प्रक्रिया बऱ्याच काळापासून होत आहे. सध्या भारतीय वायुदलात ‘मिग-21’ बायसन या प्रकारची विमाने कार्यरत आहेत. त्याआधीचे या विमानांचे प्रकार पूर्वीच निवृत्त करण्यात आले आहेत. आता ही विमानेही निवृत्त होणार असल्याने ‘मिग-21’ विमानांचे युग समाप्त होणार आहे.

रशिया निर्मित विमाने

रशियाच्या मिकोयान-गुरेव्हिच कक्षाने सात दशकांपूर्वी या विमानांची निर्मिती केली होती. त्यावेळी ती जगातील सर्वोत्तम विमानांपैकी एक होती. 1963 मध्ये या विमानांचा समावेश भारतीय वायुदलात करण्यात आला होता. त्यावेळी ती भारताची प्रथम ‘स्वनातीत’ विमाने किंवा सुपरसॉनिक विमाने म्हणून ओळखली गेली. स्वनातीत याचा अर्थ ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारी विमाने असा आहे. त्यांचा भारतीय वायुदलात समावेश झाल्यापासून आजपर्यंत आपल्या वायुदलाने 870 ‘मिग-21’ विमानांचा उपयोग केला आहे, अशी माहिती देण्यात आली.

दोन युद्धांमध्ये पराक्रम

‘मिग-21’ या विमानांनी 1965 आणि 1971 या पाकिस्तान विरोधात झालेल्या दोन युद्धांमध्ये भारतासाठी पराक्रम गाजविला आहे. या दोन्ही युद्धांमध्ये भारतीय सेनादलांना वर्चस्व मिळवून देण्याची महत्वाची कामगिरी या विमानांनी केली आहे. त्यामुळे त्यांनी भारताची केलेली सेवा सदैव स्मरणात राहणार आहे.

Comments are closed.