घरांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकवू,  गिरणी कामगारांचा भाजप सरकारला इशारा

गिरणी कामगारांनी आपले रक्त आणि आयुष्य मुंबई व महाराष्ट्र घडवण्यासाठी दिले. आजही हजारो कामगार आणि त्यांचे वारस घरापासून वंचित आहेत. सरकारकडून फक्त निवडणुकांच्या काळात खोटय़ा घोषणा आणि आश्वासने मिळतात. मात्र प्रत्यक्ष काहीच होत नाही. तातडीने गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला गेला नाही, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला एकही मत मिळणार नाही, असा गंभीर इशारा गिरणी कामगार संघटनेने भाजपाला दिला.

गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार यांच्या घरांच्या प्रश्नांकडे राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने संतापाचा भडका उडाला आहे. गिरणी कामगार संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून गिरणी कामगारांची नाराजी स्पष्टपणे कळवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरणी कामगारांच्या मागण्यांकडे सतत डोळेझाक केली असून त्यांच्याकडून केवळ खोटय़ा आश्वासनांचा पाऊस पडत आहे, असा गंभीर आरोप  तेजस कुंभार यांनी केला. तर पात्रता निश्चिती प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गोंधळ झाला असून कामगार आयुक्त कार्यालयात अपील दाखल करूनही कामगारांना पात्र ठरवले जात नाही, असा आरोप संघटनेचे सेक्रेटरी विठ्ठल चव्हाण यांनी केला आहे.

Comments are closed.