ट्रम्प यांच्याविरोधात जनतेचे बंड! 80 लाख लोक उतरले रस्त्यावर!! इराण युद्ध आणि महागाईमुळे अमेरिकेत आंदोलनाचा वणवा 3,300 ठिकाणी निदर्शने
इराणविरुद्ध युद्ध सुरू करून संपूर्ण जगाला ऊर्जा संकटात ढकलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेसह युरोप आणि दक्षिण आशियातील काही देशांमध्ये लाखो लोकांनी तीव्र निदर्शने केली. अमेरिकेमध्येच ट्रम्प यांच्याविरोधात जनता संतप्त झाली असून ट्रम्प यांना लोकांनी विदूषक म्हणत फलक झळकावले. अमेरिकेतील 50 राज्यांमधील एक-दोन नव्हे तर 3,300 शहरांमध्ये ‘नो किंग्स रॅली’मध्ये उतरून 80 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ट्रम्प यांच्याविरोधात तीव्र निदर्शने केली. ‘जोकरला निवडाल तर सर्कशीचीच अपेक्षा ठेवा,’, ‘विदुषका, राजमुकुट खाली ठेव’ असे फलक झळकावत जनतेचे ट्रम्प यांच्याविरोधातील संताप व्यक्त केला.
ट्रम्प यांच्याविरोधात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातदेखील ‘नो किंग्स’ मोर्चे काढण्यात आले होते, मात्र अमेरिकेच्याच नागरिकांना युद्धाच्या झळा बसत असल्यामुळे यावेळी मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत तीन वेळा ट्रम्प यांच्याविरोधात ‘नो किंग्स’ निदर्शने झाली आहेत. ट्रम्प यांच्या धोरणांवर नागरिक नाराज असून इराणविरोधात वाढता तणाव, वाढती महागाई तसेच कठोर इमिग्रेशन नियमांवरून ट्रम्प यांच्याविरोधात रोष वाढला आहे. ‘नो किंग्स’ निदर्शनात सहभागी झालेल्या नागरिकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस यांच्याविरोधात फलक झळकावून त्यांना हटवण्याची मागणी केली. अमेरिकेत मिनीअॅपोलीस, पोर्टलॅण्ड, सेंट पॉल, बोस्टन इत्यादी शहरांमध्ये लाखो लोकानी ट्रम्प सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
ट्रम्प यांच्या अटकेची मागणी
वॉशिंग्टन डीसीमध्ये हजारो लोकांनी लिंकन स्मृतिस्थळापासून नॅशनल मॉलपर्यंत मोठा मोर्चा काढला. त्यात सहभागी झालेल्यांच्या हातात ‘विदुषका, राजमुकुट खाली ठेव’, ‘ट्रम्प, व्हेंस, काश पटेल इत्यादींना अटक करा’ असे लिहिलेले फलक होते. लॉस अँजेलिसमध्येही हजारो लोकांनी मोर्चा काढला. ‘विदुषकाला निवडाल तर सर्कशीचीच अपेक्षा ठेवा’ असे फलक निदर्शकांनी झळकावले. न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरवर लोकांनी एपस्टीन आणि ट्रम्प यांचे फलक झटकावून ट्रम्प यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
हिंदुस्थान, युरोपमध्येही ट्रम्प यांचा निषेध
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात युरोपमध्येही तीव्र नाराजी दिसून आली. लंडन, पॅरिस, रोम यासह युरोपमधील अनेक शहरांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने करत घोषणाबाजी केली. निदर्शकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्व धोरणांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. पॅरिसमध्ये एका महिलेने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची वेशभूषा धारण करत ‘नो किंग्स’ निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला. हिंदुस्थानात हैदराबादमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात नागरिकांनी निदर्शने आणि घोषणाबाजी केली.
Comments are closed.