मुंबईसह राज्यातील 13 महानगरपालिकांत एमआयएमचे 95 उमेदवार विजयी

महाराष्ट्रातील महानगरपालिकांत असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआएमने पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यातील 13 पालिकांत एमआयएमचे एकूण 95 उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाडा, मालेगावपर्यंत मर्यादित असलेल्या एमआयएमने राज्यातील इतर महानगरपालिकांतही आपले अस्तित्व दाखविण्यास आता सुरुवात केली आहे. मुंबईत समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरात एमआयएमने विजय मिळवत मोठा राजकीय धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक 134, 136, 137, 138, 139 आणि 145 अशा सहा जागांवर एमआएमने विजय मिळवला आहे, तर ठाणे महापालिकेत 5 जागा जिंकल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एमआयएमने 33 जागा जिंकत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मालेगाव महानगरपालिकेत एमआयएमने 20 उमेदवार विजयी करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. याशिवाय सोलापूर, धुळे आणि नांदेड या तीन महानगरपालिकांमध्ये प्रत्येकी 8 जागांवर एमआयएमच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या तीन शहरांमधून एकूण 24 नगरसेवक निवडून आले आहेत.

विदर्भातही खाते उघडले

अमरावतीमध्ये एमआयएमचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत, तर नागपुरात 4 जागांवर एमआयएमने यश मिळवले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतही एमआयएमने पहिल्यांदाच विजयाचे खाते उघडले असून हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments are closed.