तीन दिवसांनी नैतिकता आणि लोकशाही मूल्ये आठवली! अखेर कोकाटेंचा राजीनामा; नाशिक पोलीस मुंबईत, कोणत्याही क्षणी अटक

1995 मधील शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने अडचणीत आलेले अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तीन दिवसांनी आज कोकाटे यांना नैतिकता आणि अजित पवार गटाला लोकशाही मूल्ये आठवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला. अजित पवार यांनी तो स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, नाशिक पोलीस मुंबईत दाखल झाले असून कोकाटे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

माणिकराव कोकाटे यांनी क्रीडामंत्री पदाचा राजीनामा दिल्याची माहिती अजित पवार यांनी स्वतः ट्विट करून दिली. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे, असे अजित पवार यांनी त्यात नमूद केले आहे.

‘सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे.

कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू’ असेही अजित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखून नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा देत असून त्याचा स्वीकार करावा असे राजीनामापत्र कोकाटे यांनी अजित पवार यांना लिहिले होते. त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली.

नवा क्रीडामंत्री कोण?

कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर क्रीडामंत्री पद रिक्त झाले आहे. सध्या त्याचा प्रभार अजित पवार यांच्याकडे देण्यात आला आहे. आता त्या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागते यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. धनंजय मुंडे कमबॅकसाठी प्रयत्नशील असले तरी त्यांना पुन्हा मंत्रीपद देऊन अनेकांचे वाद ओढवून घेण्यापेक्षा दुसऱयाच एखाद्या आमदाराला मंत्री बनवण्याचा विचार अजित पवार करत असल्याचेही कळते.

आरोपपत्राची प्रत आली समोर, काय सांगताकोकाटेंचे वार्षिक उत्पन्न फक्त 30 एक हजार रु.!

न्यायालयाने ज्या आरोपपत्राच्या आधारे कोकाटे बंधूंना सदनिका घोटाळय़ात दोषी ठरवले शिक्षण ठोठावली त्याची प्रत समोर आली आहे. 'माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांनी गोंधळ केली. बनावट कागदपत्रे बनवले. वार्षिक उत्पन्न 30 एक हजार रुपयांपेक्षा कमी दाखवले. जागेची तीव्र निकड असल्याचे भासवले. खोटे दाखले आणि कागदपत्रे सादर करून शासनाच्या दहा टक्के कोटय़ातून नाशिकमधील vise मळा येथील बांधकाम रंग अपार्टमेंटमध्ये सदनिका मिळवल्या हस्तांतरित केल्या. चारही सदनिका बेकायदेशीररीत्या एकत्र करून शासनाची फसवणूक केली', असे या आरोपपत्रात नमूद केले आहे.

वॉरंट बजावून अटकेच्या कारवाईसाठी नाशिक पोलिसांचे पथक सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्यासह मुंबईत दाखल झाले आहे. कोकाटे हे  लीलावती रुग्णालयात दाखल असून पोलीस तिथे धडकणार आहेत. कोकाटे यांचे बंधू विजय यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

Comments are closed.