किडनी रॅकेटमधील आरोपींना मोक्का लावण्याच्या हालचाली, गृहराज्य मंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिह्यातील शेतकऱ्याने सावकरी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकल्याच्या घटनेची व्यापक चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. या किडनी विक्री रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्यासाठी कायद्यातील तरतुदी तपासून घेण्यात येतील, अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोईर यांनी आज आज विधानसभेत दिली.

चंद्रपूर जिह्यातील नागभिड तालुक्यातील मिंथूर येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांनी कर्जाच्या विळख्यात ओढून कंबोडियात जाऊन किडनी विकण्यास भाग पाडल्याची घटना मागील डिसेंबरमध्ये घडल्याच्या घटनेकडे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. महाराष्ट्रासाठी ही लाजिरवाणी घटना आहे. ही संघटित गुन्हेगारी आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये गुंतलेल्यांना मोक्का लावण्याची मागणी यावेळी अतुल भातखळकर यांनी केली.

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगरमध्ये हे प्रकार घडले आहेत. 19 जणांच्या किडन्या विकल्या गेल्या आहेत. किडन्या विकण्याच्या रॅकेटमधील आरोपांना फाशीच दिली पाहिजे. याचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. पद्मश्री मिळालेला डॉक्टर यामध्ये गुंतला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर, नितीन राऊत आदींनी भाग घेतला. या चर्चेला उत्तर देताना राज्य मंत्री पंकज भोयर म्हणाले की, यामध्ये कोणीही अगदी पद्मश्री मिळालेला डॉक्टर असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पंकज भोयर यांनी दिले.

Comments are closed.