Minister Yogesh Kadam clearifies after allegations on his statements
मुंबई : स्वारगेटमधील बस स्थानकामध्ये 26 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना मंगळवारी (25 फेब्रुवारी) घडली. त्यानंतर 26 फेब्रुवारीला ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून या घटनेवरून राज्य सरकारला धारेवर धरले. त्यानंतर तब्बल 70 तासांनंतर आरोपी दत्ता गाडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पण यावेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा झाली. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांना सल्ला दिला. यानंतर आता स्वतः मंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. (Minister Yogesh Kadam clearifies after allegations on his statements)
हेही वाचा : Swargate Rape Case : दत्ता गाडेच्या अटकेवरून श्रेयवादाची लढाई? अमितेश कुमार म्हणाले…
“मी गृहराज्य मंत्रिपद स्वीकारल्यानंतर अनेकदा बैठकींमध्ये महिला सुरक्षाविषयक निर्णय घेतले आहेत. काल मी जे काय विधान केले, त्याचा विरोधकांकडून विपर्यास केला गेला. मी स्वारगेटच्या घटनास्थळी गेल्यानंतर मला असे कळाले की ती जागा रहदारीची आहे. असे असतानाही त्या महिलेवर अत्याचार होत असताना कोणी ऐकले कसे नाही? हा प्रश्न मी जेव्हा त्या पोलिसांना विचारला, त्यांनी जे मला उत्तर दिले. ते मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. माझ्या या विधानाचा विरोधक राजकारणासाठी उपयोग करत आहेत.” असे म्हणत त्यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. “आमच्या सरकारमध्ये महिलांवरील अत्याचार अजिबात सहन केला जाणार नाही. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे, असे मी सांगितले. त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही. उलट आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची यंत्रणा दोन दिवस अथक काम करत होती. त्यांना यश आले असून आता आरोपीवर कठोर कारवाई होईल, असे आमचे प्रयत्न आहे. मी माझा उद्देश स्पष्ट केला आहे. त्यावरून कोणी राजकारण करु नये,” असे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले आहे.
गुरुवारी (27 फेब्रुवारी) गृहराज्यमंत्री योगेश कदम पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, “एखादा विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेला गोड बोलून तीन ते चार मिनिटे बोलून तिला जाळ्यात ओढले. मग काय घडले हे आता सर्वांसमोर आहे. पण, त्यावेळेस तिथे कोणतीही हाणामारी झालेली नाही, कोणताही वाद किंवा कोणताही प्रतिकार करण्यात आला नाही. जे काही घडलं ते अतिशय शांततेत घडले. त्यामुळे तिथे जे काही घडले ते जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल तेव्हाच कळेल.” असे वादग्रस्त विधान केले. यावरून एकीकडे विरोधकांकडून टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” योगेश कदम नवीन आहेत. तरूण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईन की, अशा प्रकरणात बोलताना थोडे जपून, संवेदनशीलपणे बोलले पाहिजे.” असा सल्ला दिला.
Comments are closed.