मंत्र्यांना तरुणांशी जोडण्याचे काम दिले.

प्रत्येक केंद्रीय मंत्री प्रतिदिन विद्यापीठाला भेट देणार

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील तरुणाईशी जोडून घेण्यासाठी केंद्र सरकारने एका महत्वाच्या योजनेचा प्रारंभ केला आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक केंद्रीय मंत्री प्रत्येक दिवशी एका विद्यापीठाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हे अभियान सातत्याने चालणार असून त्याला ‘एक दिन एक विद्यापीठ’ असे नाव देण्यात आले आहे.

या अभियानात प्रत्येक केंद्रीय मंत्री प्रतिदिन एका विद्यापीठाला भेट देणार असून विद्यार्थ्यांची चर्चा करणार आहे. ही चर्चा एकतर्फी असणार नाही. केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या समस्या आणि अपेक्षा ऐकून घेणार आहेत. तसेच केंद्र सरकारने युवक आणि विद्यार्थ्यांसंबंधी कोणत्या योजना लागू केल्या आहेत, यांची माहिती देणार आहे. तसेच भविष्यात केंद्र सरकारच्या युवक आणि विद्यार्थ्यांसंबंधी कोणत्या योजना असतील, याविषयीही विचारविमर्श करणार आहे. विद्यार्थ्यांच्या सूचनांचा आदरपूर्वक विचार प्रत्येक योजना लागू करताना आणि नव्या योजना आणताना केला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी देण्यात आली.

शिक्षणमंत्री निर्धारीत करणार रुपरेषा

या संपूर्ण देशव्यापी योजनेची रुपरेषा नवे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया निर्धारीत करणार आहेत. याच दोन मंत्र्यांवर भारतील सर्व विद्यापीठे आणि इतर सर्व केंद्रीय मंत्री यांच्यात समन्वय साधण्याचे उत्तरदायित्वही सोपविण्यात आले आहे. हे दोन मंत्री सर्व मंत्र्यांचा विद्यापीठ भेट कार्यक्रम निश्चित करणार असून प्रत्येक विद्यापीठाच्या भेटीत काय घडामोडी घडल्या, याचा अहवाल सादर केला जाणार आहे. हा अहवाल वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच ही महत्वाकांक्षी योजना साकारण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत या योजनेवर व्यापक चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच स्वीकारले होते. बैठकीत या नव्या योजनेचे महत्व आणि संभाव्य परिणाम यांच्यावर विचारविमर्श करण्यात आला. देशाचे भवितव्य नव्या पिढीच्या हाती आहे. या पिढीच्या संपर्कात राहणे हे केंद्र सरकारचे आणि प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रीय मंत्र्याने ही योजना यशस्वी करण्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे, असे या बैठकीत निर्धारीत करण्यात आले आहे, अशी महिती देण्यात आली आहे.

देशात 1,300 विद्यापीठे

भारतात आजमितीला 1,300 हून अधिक विद्यापीठे आहेत. या विद्यापीठांमध्ये वास्तव्य करुन लक्षावधी विद्यार्थी आणि युवक शिक्षण घेत आहेत. तसेच या विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांचा आणि अपेक्षांचा कानोसा घेणे आणि त्याप्रमाणे सरकारी योजनांचे स्वरुप निर्धारित करणे  शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्री विद्यापीठांना केवळ औपचारीक भेटी देणार नाहीत. ते सक्रीयपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यांच्याशी शक्य होईल तितकी व्यक्तीगत चर्चा करतील. तसेच, मुख्यत: त्यांचे म्हणणे ऐकून घेतील. यामुळे विद्यार्थ्यांनाही सरकारच्या संपर्कात येण्याची संधी प्राप्त होईल, असे दिसून येते.

Comments are closed.