टपऱ्यांची कारवाई थांबवण्यासाठी मंत्रालयातून हलली सूत्रे, पुणे बाजार समितीच्या कारवाईवर संशयाची सावली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मोठा गाजावाजा करत बाजारातील अनधिकृत टपऱ्या, शेड आणि अतिक्रमणांवर कारवाईची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या पुणे बाजार समितीचा ‘कारभार’ बुधवारी उघड झाला. टपऱ्या आणि कांदा शेडवरील कारवाईला अचानक ब्रेक देत समितीने थेट डाळिंब यार्डवरील शेड पाडण्याची कारवाई केली. टपऱ्यांवरील कारवाई थांबवण्यामागे मंत्रालयातूनच सूत्रे हलल्याची जोरदार चर्चा बाजारात रंगली आहे. त्यामुळे आता बाजारात आता मावा, गुटखा, तंबाखू विक्रीला मोकळीक मिळाली आहे.

सलग तीन अधिवेशनांत बाजार समितीच्या संचालक मंडळावर टपऱ्या, अनधिकृत शेड, अतिक्रमण, तसेच मनमानी पद्धतीने टेंडर वाटप केल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर समितीने कारवाईची घोषणा केली होती. टपरीधारकांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. बुधवारी मोठ्या तयारीने जेसीबी, क्रेन, डंपर आदी यंत्रणा बाजारात दाखल झाली. मात्र अपेक्षित टपऱ्यांवरील कारवाईला अचानक स्थगिती देण्यात आली. टपऱ्या आणि कांदा शेडवर कारवाई न करता थेट डाळिंब यार्डमधील शेडवर हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे बाजारातील व्यापारी आणि कामगारांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अधिवेशनात कारवाईचे दमदार आश्वासन देणाऱ्या भाजपच्या काही आमदार आणि मंत्र्यांनी मंत्रालयातूनच टपऱ्यांवरील कारवाई थांबवण्याचे आदेश दिल्याची चर्चा बाजारात रंगली आहे. नियोजित कारवाईत अचानक बदल झाल्याने अधिकारी वर्गही चक्रावल्याचे सांगितले जाते.

ठराविक नेत्यांच्या उपस्थितीत कारवाई!

डाळिंब यार्डवरील कारवाईदरम्यान बाजारातील आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष तसेच माजी संचालक उपस्थित होते. मात्र शेजारील कांदा शेड आणि बाजारातील टपऱ्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे निवडक कारवाई झाल्याची चर्चा बाजारात रंगली आहे.

Comments are closed.