Mira Road Protest: मुख्यमंत्र्यांच्या दाव्याची पोलखोल! मीरा रोडच्या घटनेचा मोर्चा घोडबंदराला काढतं का? संदीप देशपांडे यांचा सवाल

मीरा रोडमध्ये मराठी भाषिकांच्या विरोधात व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. या घटनेच्या विरोधात मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मात्र या मराठी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. यामुळे मराठी जन नाराज झाले. तसेच मोर्चास परवानगी नाकारण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर मराठी जनांचा संताप उफाळून आला.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्याचे दावे फेटाळले. संदीप देशपांडे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त मार्ग बदलण्यास सांगितला होता. मात्र मला स्पष्टप सांगायचं आहे की, पोलीस मोर्चाची परवानगी द्यायला तयार नव्हते, आणि जो मार्ग बदलण्याचा विषय आहे तर, घटना घडली मीरा रोडमध्ये, व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोडमध्ये आणि आम्हाला सांगत होते, मोर्चा काढा घोडबंदर रोडवर, याचा अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती. मीरा रोडमधल्या घटनेचा घोडबंदरमध्ये कुणी मोर्चा काढतं का?’, असा त्यांनी उपस्थित केला.
मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ का काढू दिला नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले…
दरम्यान, मीरारोड इथे मराठीच्या मुद्द्यावर आज मराठी मोर्चाची हाक दिली होती. यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे मराठी जनांमध्ये संतापाची लाट उसळली. पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला असे असताना देखील मराठी जनता रस्त्यावर उतरली. जमावबंदीचा आदेश डावलून विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर छत्रपती शिवरायांच्या वेशात आंदोलनात सहभागी झालेल्या एका मुलाला पोलिसांनी धमकावलं. पोलीस आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं होतं.
Comments are closed.