‘मिर्झापूर: द मुव्ही’ला ‘ए’ प्रमाणपत्र; इंटिमेट सीन्स, आक्षेपार्ह संवादांवर सेन्सॉरची कात्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’च्या चाहत्यांमध्ये ‘मिर्झापूर: द मुव्ही’ची प्रचंड उत्सुकता आहे. ओटीटीवर गाजलेल्या या मालिकेतील पात्रे आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यावर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) कात्री चालवली आहे. वृत्तानुसार, चित्रपटातील काही प्रणयदृश्यांवर कात्री लावण्यात आली असून, अनेक आक्षेपार्ह शब्द आणि संवादांमध्येही बदल करण्यात आले आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यापूर्वी CBFCने निर्मात्यांना काही बदल करण्याचे निर्देश दिले. चित्रपटातील चार अपमानास्पद शब्द पूर्णपणे हटवण्यात आले, तर सहा शब्दांच्या जागी पर्यायी संवाद वापरण्यात आले आहेत. ‘गले से लग कर’ हा संवादही बदलण्याचे निर्देश देण्यात आले.

चित्रपटाच्या पूर्वार्धातील एका आक्षेपार्ह शब्दाऐवजी ‘कंबर’ हा शब्द वापरण्यात आला आहे. उत्तरार्धातील ‘लंथ’ म्हणजेच ‘मूर्ख’ या अर्थाचा शब्दही बदलण्यात आला आहे. याशिवाय काही कलाकारांच्या नावांमध्येही बदल करण्यास सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. चित्रपटातील प्रणयदृश्यांमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. अहवालानुसार, अशा दृश्यांपैकी सुमारे 50 टक्के भाग कमी करण्यात आला आहे. पूर्वार्धातील आणि उत्तरार्धातील अशा दोन दृश्यांमध्ये दृश्य आणि ध्वनी या दोन्ही पातळ्यांवर बदल करण्यात आले. या प्रक्रियेत चित्रपटातील एकूण 35 सेकंदांची प्रणयदृश्य हटवण्यात आले आहे. काही दृश्यांमध्ये बदल केल्यानंतरच चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले.

विशेष म्हणजे, चित्रपटात मोठ्या प्रमाणात हिंसा आणि शिवीगाळ असतानाही CBFCने हिंसाचाराचे कोणतेही दृश्य हटवलेले नसल्याचे वृत्त आहे. मात्र, चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे केवळ प्रौढ प्रेक्षकांनाच हा चित्रपट पाहता येणार आहे. सेन्सॉर प्रमाणपत्रानुसार, ‘मिर्झापूर: द मुव्ही’चा कालावधी 197.19 मिनिटे आहे. म्हणजेच चित्रपट तब्बल 3 तास 17 मिनिटे 19 सेकंदांचा आहे.

Comments are closed.