दिल्ली पोलिसांकडून महिलांशी गैरवर्तन?

आरोपानंतर गुन्हे शाखेकडे सोपवला तपास : ‘सीजेपी’चे आंदोलन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील जंतरमंतर येथे दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप तीन महिला पत्रकारांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे सोपवले आहे. गुन्हे शाखा आता महिला पत्रकारांचे जबाब नोंदवून संपूर्ण प्रकरणाचा तपास करेल.

आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले तेव्हा कोणतीही महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित नव्हती, असा दावा महिला पत्रकारांनी केला. ‘आयसा’च्या अध्यक्षा नेहा बोरा यांना ताब्यात घेताना एसीपी विवेक भगत यांनी तिच्या छातीवर मारहाण केली आणि तिला दूर ढकलून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे उत्तराची मागणी केली. ‘दिल्लीतील महिला आणि विद्यार्थी त्यांच्या सुरक्षेबद्दल चिंतित असून आंदोलन करत आहेत. दिल्ली पोलीस गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलेच पाहिज’s, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

सीजेपीचाही कडक पवित्रा

महिलांशी झालेल्या गैरवर्तनाच्या या प्रकाराबाबत सीजेपीनेही कडक पवित्रा घेतला आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी सीजेपीने केली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी लैंगिक छळाच्या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास नकार दिला आहे. एफआयआर दाखल करण्यापूर्वी ते सीसीटीव्ही फुटेज तपासतील, असे पोलिसांनी सांगितले. यावर गंभीर तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी दिल्ली पोलीस संबंधित अधिकाऱ्याचे संरक्षण करत आहे का? असा प्रश्न सीजेपीने उपस्थित केला.

Comments are closed.