मिस युनिव्हर्स 2025 वादाच्या भोवऱ्यात, ऑलिव्हिया यासेने किताब केला परत, चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला संताप

मिस युनिव्हर्स २०२५ चा अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी बँकॉकमध्ये पार पडला. मेक्सिकोच्या फातिमा बॉशने किताब जिंकला. परंतु सुरुवातीपासूनच ही स्पर्धा वादांमुळे गाजली होती. त्यामुळे अंतिम फेरीनंतरही हा वाद कायम तसाच राहिला.

अंतिम फेरीच्या काही दिवसांनंतर, कोट डी’आयव्होअरच्या ओलिव्हिया यासेने घोषणा केली की, ती मिस युनिव्हर्स आफ्रिका आणि ओशनिया २०२५ चा किताब परत करणार आहे. मिस कोट डी’आयव्होअर कमिटी (COMICI) ने सांगितले की, वैयक्तिक कारणांमुळे ऑलिव्हियाने संस्थेला कळवले आहे की, ती आता कोणतेही पद किंवा जबाबदाऱ्या सांभाळणार नाही.

ओलिव्हियाने इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, ही भूमिका तिच्या मूल्ये आणि तत्त्वांशी जुळत नाही. तिने लिहिले, “मी आदर, प्रतिष्ठा आणि समान संधीवर विश्वास ठेवते. या पदावर राहिल्याने मला माझ्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचता आले नसते. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत मिस युनिव्हर्स आफ्रिका आणि ओशनिया आणि मिस युनिव्हर्स कमिटीशी असलेले सर्व संबंध तोडत आहे.”

अंतिम फेरीनंतर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमुळे, ऑलिव्हियाचा आत्मविश्वास आणि प्रभावी कामगिरी अधोरेखित झाली. त्यामुळे लोकांनी तिला योग्य विजेती म्हटले आहे. मिस युनिव्हर्स २०२५ ज्युरीचे सदस्य लेबनीज-फ्रेंच संगीतकार ओमर हार्फौचे यांनी अंतिम फेरीच्या तीन दिवस आधी राजीनामा दिला. त्यांनी खुलासा केला की, मिस मेक्सिकोचा विजय पूर्वनिर्धारित होता आणि तो फातिमा बॉशच्या वडिलांच्या व्यावसायिक संबंधांमुळे होता.

अंतिम फेरीनंतर पद सोडणारी ऑलिव्हिया ही एकमेव नाही. २०२५ ची मिस युनिव्हर्स एस्टोनिया ब्रिजिता शॅबॅक हिनेही पद सोडले. या घटनांमुळे चाहत्यांमध्ये स्पर्धेच्या निष्पक्षतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

Comments are closed.