कॅलिफोर्नियामध्ये 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कॅलिफोर्नियामध्ये गेल्या 6 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासैया असे 22 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव असून तो युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले (UC Berkeley) येथे शिकत होता. 9 फेब्रुवारी रोजी तो बेपत्ता झाला होता

सॅन फ्रान्सिस्कोमधील हिंदुस्थानी दूतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला. स्थानिक पोलिसांनी बेपत्ता हिंदुस्थानी विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया याचा मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. या कठीण प्रसंगी आम्ही साकेतच्या कुटुंबाप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो, अशी पोस्ट हिंदुस्थानी दूतावासाने एक्स या सोशल मिडिया माध्यमावर केली आहे. हिंदुस्थानी दूतावास सध्या साकेतच्या कुटुंबाच्या संपर्कात असून, त्याचा मृतदेह हिंदुस्थानात आणण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

साकेत ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याला शेवटचे बर्कले हिल्स येथील लेक अंझा परिसरात पाहिले गेले होते. साकेतची बॅग, ज्यामध्ये त्याचा पासपोर्ट आणि लॅपटॉप होता, ती शेजारच्या एका घराच्या पायऱ्यांवर सापडली होती. साकेतचा रूममेट बनीत सिंग याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून त्याला शोधण्यासाठी मदत मागितली होती. कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनीही परराष्ट्र मंत्रालयाला या प्रकरणी मदत करण्याचे आवाहन केले होते.

कोण होते साकेत श्रीनिवासय्या?

साकेत हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी होता. त्याने IIT मद्रास मधून 2025 मध्ये केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक (B.Tech) पूर्ण केले होते. सध्या तो युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे केमिकल आणि बायोमॉलिक्युलर इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री (M.S.) करत होता.

Comments are closed.