एकाच मालिकेत दोन कर्णधार; घरच्या मैदानावरील सामन्यांसाठी संघाची घोषणा

यंदाचा टी-२० विश्वचषक संपल्यानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे लक्ष आता न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेकडे वळले आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल, ज्यासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेतील खास गोष्ट म्हणजे दोन वेगवेगळे कर्णधार संघाचे नेतृत्व करताना दिसतील.
मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करेल. तर उर्वरित दोन सामन्यांसाठी संघाची धुरा टॉम लॅथमकडे सोपवण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना १५ मार्च रोजी माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर खेळला जाईल.
दरम्यान, टॉम लॅथम टी-२० आंतरराष्ट्रीय संघात परतला आहे. अनुभवी विकेटकीपर-फलंदाज असलेल्या लॅथमने एप्रिल २०२३ नंतर पहिल्यांदाच टी-२० संघात स्थान मिळवले आहे. त्याने अलिकडच्या सुपर स्मॅश स्पर्धेत सर्वाधिक धावा करून कॅन्टरबरी किंग्ज संघासाठी प्रभावी कामगिरी केली होती. म्हणूनच निवड समितीने त्याच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. न्यूझीलंड क्रिकेट निवड समितीचे निवडक गॅव्हिन लार्सन म्हणाले की, लॅथमचा अनुभव आणि नेतृत्व संघासाठी महत्त्वाचे असेल.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ –
मिचेल सॅन्टनर (कर्णधार – पहिला ते तिसरा सामना), केटीन क्लार्क (चौथा आणि पाचवा सामना), जोश क्लार्कसन, डेन क्लीव्हर (यष्टिरक्षक – चौथा आणि पाचवा सामना), डेव्हॉन कॉनवे (यष्टिरक्षक – पहिला ते तिसरा सामना), लॉकी फर्ग्युसन (दुसरा आणि तिसरा सामना), जॅक फॉल्क्स, बेव्हॉन जेकब्स, काइल जेमिसन, निक केली, टॉम लॅथम (यष्टिरक्षक, चौथा-पाचवा सामना कर्णधार), जेडन लेनॉक्स (चौथा आणि पाचवा सामना), कोल मॅककॉन्ची, जिमी नीशम, टिम रॉबिन्सन, बेन सिअर्स, नॅथन स्मिथ, ईश सोढी.
Comments are closed.