मिशेल स्टार्क या खास रेकॉर्डपासून फक्त 5 विकेट दूर, लवकरच होणार महान खेळाडूंच्या क्लबमध्ये एंट्री!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना गुरूवार 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कवर सर्वांची नजर असेल. तो एमएसजी येथे खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मोठी कामगिरी करू शकतो.

डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या मालिकेत जोरदार फॉर्ममध्ये आहे. जर स्टार्कनं चौथ्या कसोटी सामन्यात 5 विकेट घेतल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा ऑस्ट्रेलियाचा केवळ चौथा गोलंदाज बनेल. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 3 सामन्यांनंतर 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत स्टार्कनं आतापर्यंत 14 विकेट घेतल्या आहेत.

स्टार्कनं पिंक बॉल कसोटीत 6 विकेट्स घेतल्या होत्या. जसप्रीत बुमराहनंतर तो या मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. मिचेल स्टार्कचं लक्ष्य मेलबर्न कसोटीत आणखी पाच विकेट्स घेण्याकडे असेल. असं केल्यास तो ऑस्ट्रेलियासाठी 700 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या क्लबमध्ये सामील होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार्कनं आतापर्यंत 695 विकेट घेतल्या आहेत.

दिवंगत फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (1001 विकेट), माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (949 विकेट) आणि ब्रेट ली (718 विकेट) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. स्टार्कनं 284 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.67 च्या सरासरीनं 695 विकेट्स घेतल्या आहेत. 6/28 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यानं कांगारुंसाठी विक्रमी 24 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

मिचेल स्टार्कनं कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं 92 सामन्यात 27.55 च्या सरासरीनं 372 विकेट घेतल्या. या फॉरमॅटमध्ये त्यानं 15 वेळा 5 विकेट्सही घेतल्या आहेत. स्टार्कच्या नावावर 127 एकदिवसीय सामन्यात 244 विकेट आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटमध्येही ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज आहे.

हेही वाचा –

चॅम्पियन्स ट्रॉफीचा नॉकआऊट किंवा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
मेलबर्न कसोटीपूर्वी कर्णधार रोहित शर्माबाबत आलं मोठं अपडेट, आता टीम इंडियाचं चित्र बदलणार!
संघाला धक्का! दिग्गज फिरकीपटू बॉक्सिंग डे कसोटीमधून बाहेर, कारण जाणून घ्या

Comments are closed.