मिथुन मनहास बीसीसीआय अध्यक्ष,रघुराम भट कोषाध्यक्ष तर अमिता शर्मा महिला निवड समिती प्रमुख
जम्मू-कश्मीर क्रिकेट संघटनेत सक्रिय असलेल्या मिथुन मनहास यांची हायकमांडने ठरविल्याप्रमाणे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड़ करण्यात आली आहे. तीसुद्धा बिनविरोध आणि एकमताने. बीसीसीआयच्या 94 व्या वार्षिक सर्वसाधारण मनहास हे बीसीसीआयचे 37 वे निवडून आलेले अध्यक्ष ठरले.
बीसीसीआयचे नेतृत्व गेल्या पाचही वेळा अंतरिम अध्यक्षांकडे होते, मात्र मनहास यांच्या निवडीने रॉजर बिन्नी यांचे रिक्त स्थान भरले गेले. बिन्नी यांनी ऑगस्टमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे तात्पुरते अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. आता शुक्ला उपाध्यक्षपदी कायम राहिले असून देवजित सैकिया हे सचिव म्हणूनच कार्यरत राहतील.
कर्नाटकचे माजी फिरकीपटू आणि 2022-25 दरम्यान कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष असलेले ए. रघुराम भट हे खजिनदारपदी विराजमान झाले आहेत. तर माजी खजिनदार प्रभतेज सिंह भाटिया यांना संयुक्त सचिवपद देण्यात आले.
अध्यक्षपदासाठी मनहास यांचे नाव गेल्याच आठवडय़ात निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आज केवळ नाव जाहीर करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर मनहास म्हणाले, ‘जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. जबाबदारीही तितकीच मोठी आहे. ती मी प्रामाणिकपणे पार पाडीन. माझ्या क्रिकेटपटू व प्रशासक म्हणून केलेल्या कामाचा मला आज फायदा झाला आहे. गेली चार वर्षे मी जम्मू-कश्मीर क्रिकेट संघटनेत कार्यरत होतो.’
46 वर्षीय मनहास यांनी 1997-98 ते 2016-17 या काळात 20 वर्षे देशांतर्गत क्रिकेट खेळले. त्यांनी 157 प्रथम श्रेणी सामन्यांत 9714 धावा, 130 लिस्ट-ए सामन्यांत 4126 धावा व 91 टी–20 सामन्यांत 1170 धावा केल्या. दिल्लीकडून कारकीर्द सुरू करून त्यांनी 2015 मध्ये जम्मू-कश्मीर संघात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी निवृत्त झाले. प्रशिक्षक म्हणून त्यांनी 19 वर्षांखालील बांगलादेश संघासह, तसेच पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या आयपीएल संघांबरोबर काम केले आहे.
निवड समित्यांमध्ये बदल
माजी हिंदुस्थान गोलंदाज प्रज्ञान ओझा आणि आर. पी. सिंग यांची वरिष्ठ पुरुष निवड समितीत नवीन नियुक्ती झाली आहे. ते एस. शरथ व सुब्रोतो बॅनर्जी यांच्या जागी आले आहेत. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती ऑक्टोबर 2026 पर्यंत कार्यरत राहील. सदस्य म्हणून अजय रात्रा आणि शिवसुंदर दास कायम आहेत. शरथ यांना कनिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात आले असून त्यांच्यासोबत हरविंदर सोढी, पथिक पटेल, कृष्णमोहन आणि रणदेब बोस हे सदस्य असतील.
सौराष्ट्रचे माजी कर्णधार जयदेव शहा यांची बीसीसीआयच्या ऍपेक्स कौन्सिलमध्ये नियुक्ती झाली आहे. मिझोरमचे खैरूल जमाल मजुमदार यांना ऍपेक्स कौन्सिलमधून आयपीएल संचलन मंडळात स्थान देण्यात आले असून तेथे अरुण सिंग धुमल हे अध्यक्ष राहतील.
महिला निवड समितीतही बदल करण्यात आला असून माजी हिंदुस्थान फलंदाज अमिता शर्मा या नवीन अध्यक्ष झाल्या आहेत. त्यांच्यासह श्यामा डे, सुलक्षणा नाईक, जया शर्मा आणि श्रावंती नायडू या सदस्य आहेत.
डब्ल्यूपीएल व पायाभूत सुविधा समित्या
जयेश जॉर्ज यांची महिला प्रीमियर लीग संचालन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. या समितीत मनहास, शुक्ला, सैकिया, भाटिया, भट यांच्यासह अरुण धुमल, मधुमती लेले, संजय टंडन आणि आर. आय. पलानी यांचा समावेश आहे. पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष रोहन जेटली असून सदस्य म्हणून मनहास, शुक्ला, सैकिया, भाटिया, भट, अनिरुद्ध चौधरी आणि सना सतीश बाबू यांचा समावेश आहे.
जम्मू-कश्मीरकडे प्रथमच अध्यक्षपद
हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये जम्मू-कश्मीरला आजतागायत फारसे महत्त्व लाभू शकलेले नाही. याचेच उदाहरण म्हणजे या संघाच्या परवेझ रसूल या एकमेव क्रिकेटपटूलाच हिंदुस्थानी संघात पदार्पण करता आले आहे. त्यानंतर आता थेट जम्मू-कश्मीरच्या मिथुन मनहास यांची वर्णी लागली आहे. बीसीसीआयचे सर्वोच्च पद प्रथमच एक कश्मिरी सांभाळणार आहे. जम्मू जन्मलेल्या मनहास यांनी आपली क्रिकेट कारकीर्द दिल्लीकडून सुरू केली होती.
Comments are closed.