बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष; धोनी-विराटसोबत खेळलेल्या माजी क्रिकेटपटूचं नाव चर्चेत, कार्यभार स्वीकारताच इतिहास रचणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय नवीन अध्यक्षांच्या शोधात आहे. रॉजर बिन्नी यांचा कार्यकाळ संपल्याने बीसीसीआय अध्यक्षपदासाठी नवीन नावांची चर्चा सुरू आहे. दिल्लीच्या रणजी संघाचे माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या मिथुन मन्हास यांचे नाव यात आघाडीवर आहे. मिथुन मन्हास यांनी आज बीसीसीआय अध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला. या पदावर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
मिथून मन्हास यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मैदान गाजवलेले आहे. अर्थात त्यांना हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच मिथुन मन्हास इतिहास रचणार आहेत. सर्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणारे ते पहिलेच अनकॅप्ड खेळाडू ठरतील.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये नव्या अध्यक्षांची निवडणूक होईल. या पदासाठी उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे नाव आधी चर्चेत होते. त्यानंतर आता मिथुन मन्हास यांचे नाव आघाडीवर असल्याचे वृत्त आहे.
बिन्नींचा कार्यकाळ संपला
2022 मध्ये सौरभ गांगुली यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर बिन्नी यांनी कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी ते अध्यक्षपदाला उभे राहणारे एकमेव उमेदवार होते. बिन्नी यांच्या कार्यकाळात हिंदुस्थानने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन जागतिक स्पर्धा जिंकल्या आहेत.
Comments are closed.