संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, भाजप आमदार संदीप जोशी यांचा आरोप

महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रकरणे सातत्याने पुढे येत आहेत. शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्या मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

शासकीय निर्णय जेव्हा स्पष्ट असतात तेव्हा कुठला तरी भ्रष्ट मार्ग काढून अधिकारी स्वतःच्या बदल्या करून घेतात. मृद व जलसंधारण खात्यात पैसे घेऊन आठ अधिकाऱ्यांची बेकायदा नेमणूक करण्यात आली आहे. जलसंधारण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी शंभर टक्के पैशांचा व्यवहार झाला आहे. या गैरकारभाराची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी केली आहे.

प्रकरण काय?

31 मे 2017 च्या शासन आदेशानुसार जलसंपदा विभागातून मृद व जलसंधारण विभाग स्वतंत्र करण्यात आला. या विभागात कायमस्वरूपी समावेश होऊ इच्छिणाऱ्या अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, सुरुवातीस या विभागात येण्यास नकार देणाऱ्या आठ अधिकाऱ्यांना इतरांची पदोन्नती डावलून नियमबाह्य पद्धतीने जलसंधारण विभागात नियुक्त्या देण्यात आल्या. या नियुक्त्या देताना पैशांचा व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

375 उपविभाग अधिकारी पदोन्नतीपासून वंचित

जलसंपदा विभागाच्या निर्णयातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून प्रतिनियुक्तीने कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात समावेश करण्यात आला. त्यामुळे या विभागात कार्यरत असणाऱ्या 375 उपविभाग अधिकाऱ्यांवर अन्याय होत असून पदोन्नतीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे आमदार संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

Comments are closed.