विधानसभेला बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो, शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांची कबुली

मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्याचे आरोप विरोधी पक्षांकडून होत असतानाच ‘विधानसभा निवडणुकीत मी बाहेरून 20 हजार मतदार आणले आणि जिंकलो’, अशी कबुली आज शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा करताच त्यांनी सारवासारवही केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे मतचोरी करून सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या याचा भंडाफोड लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्रात कशा प्रकारे मतचोरी झाली याचे पुरावेही त्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे पैठणचे आमदार विलास भुमरे यांचे विधान चर्चेत आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जवळपास 20 हजार मतदार हे मी बाहेरून आणले, या मतदानाचा मला शंभर टक्के फायदा झाला, असे सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा मेळावा आज येथे पार पडला. यावेळी ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा जिंकायच्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना विलास भुमरे यांनी विधानसभेला बाहेरून मतदार आणून आपण निवडणूक जिंकल्याची कबुली दिली.

एकनाथ शिंदेंनी इशारा करताच सारवासारव

भरमेळाव्यात बाहेरून मते आणल्याची कबुली विलास भुमरे यांनी देताच मंत्री संजय शिरसाट यांना सांगून एकनाथ शिंदे यांनी विलास भुमरे यांचे भाषण मध्येच थांबवले आणि इशारा केला. त्यानंतर भुमरे यांनी माझ्या मतदारसंघातील 20 हजार मतदार हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या मतदारांना मतदानाच्या दिवशी मी घेऊन आलो, अशी सारवासारव केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Comments are closed.