MLC 2026: एकट्याने आऊट केले अर्ध्या संघाला, 24 वर्षाच्या खेळाडूने सुपर किंग्जला मिळवून दिला दमदार विजय; VIDEO
मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) २०२६ च्या हंगामातील आठव्या सामन्यात टेक्सास सुपर किंग्जने आपल्या उत्तम गोलंदाजीच्या जोरावर सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा २२ धावांनी पराभव केला. ओकलंड कोलिझियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात टेक्सासने प्रथम फलंदाजी केली आणि १६१ धावा केल्या, प्रत्युत्तरात युनिकॉर्न्सचा संघ १७.४ षटकांत केवळ १३९ धावसंख्येवर सर्वबाद झाला. या सामन्यात २४ वर्षाचा गोलंदाज विजयाचा नायक ठरला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या युनिकॉर्न्सने आक्रमक सुरूवात केली, मात्र विकेट्स पडतच राहिल्या. पॉवरप्लेमध्येच त्यांनी ३ विकेट्स गमावल्या. अमाशी डी सिल्वाने आपल्या पहिल्याच षटकात फिन ऍलनला बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात आणखी दोन विकेट्स घेत युनिकॉर्न्सला अडचणीत आणले. अमाशीने सामन्यात केवळ २८ धावा देत ४ विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
अमाशीने गोलंदाजीबरोबर क्षेत्ररक्षणातही कमाल केली. त्याने सीमारेषेवर चपळाई दाखवत चेंडू अडवला आणि थेट थ्रो करत संजय कृष्णमूर्तीला धावबाद केले. अशाप्रकारे त्याने एकट्यानेच युनिकॉन्सचा अर्धा संघ बाद केला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे युनिकॉर्न्स १७.४ षटकांत १३९ धावसंख्येवर सर्वबाद झाला. तोच या सामनाचा सामनावीर ठरला.
तत्पूर्वी नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि सैतेजा मुक्कामुल्ला यांच्यातील ७२ धावांच्या सलामीच्या भागीदारीमुळे टेक्सासने चांगली सुरूवात केली. प्लेसिसने २४ चेंडूंमध्ये दोन चौकार आण तीन षटकारांसह ४० धावा केल्या. मुक्कामुल्ला ३६ धावा करत बाद झाला. त्यानंतर टेक्सासच्याही विकेट्स पडत राहिल्या. डोनोवन फेराराने २८ चेंडूंत ४५ धावा केल्याने टेक्सासला १५० चा आकडा पार करता आला. त्यामुळे संघाने २० षटकांत ८ विकेट्स गमावत १६१ धावा केल्या.
टेक्सासचा हा या हंगामातील दुसरा विजय ठरला. यामुळे ते गुणतालिकेत ४ पैकी २ सामन्यातील विजयांसह दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी २ पैकी २ विजयांसह लॉय एजेंल्स नाईट रायडर्स पहिल्या स्थानी आहे.
Comments are closed.