एमएमआरडीएची चूक; 260 कोटी खर्चून बांधलेला मेट्रोचा पूल पाडणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भोंगळ कारभाराचा मोठा फटका सरकारी तिजोरीला बसणार आहे. मेट्रो-7ए मार्गिकेच्या विमानतळ क्षेत्रातील पुलावरील ओव्हरहेड विद्युत तारांची उंची परवानगीपेक्षा अडीच मीटरने जास्त झाली आहे. त्यामुळे बांधलेल्या पुलाचा 1 किमीचा भाग पाडून त्याची पुनर्बांधणी करावी लागण्याची शक्यता आहे. यात जनतेचे तब्बल 260 कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत.

विलेपार्ले येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात येत असलेल्या ‘एअरपोर्ट कॉलनी’ मेट्रो स्टेशन आणि पुलाचे बांधकाम विमानांच्या उड्डाण मार्गात अडथळा ठरत असल्याचे समोर आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मेट्रो पुलाच्या उंचीतील एमएमआरडीएची चूक चव्हाटय़ावर आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या उंचीच्या मर्यादेपेक्षा मेट्रो पुलाचे डिझाईन अधिक उंचीचे तयार करण्यात आले. त्यानुसार बांधकामही सुरू करण्यात आले. अतिरिक्त उंचीच्या याच चुकीमुळे एमएमआरडीएला बांधलेल्या पुलाचा एक किलोमीटरचा भाग आणि एअरपोर्ट कॉलनी मेट्रो स्टेशनचा काही भाग पाडून उंची मर्यादेचे पालन करून पुलाचे नव्याने बांधकाम करावे लागणार आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या भूमिकेवर पुलाच्या पाडकामाचे भवितव्य अवबंलून आहे.

Comments are closed.