एमएमआरडीए भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी समिती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) सहाय्यक अभियंता पदासाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
एमएमआरडीएने 235 रिक्त सहाय्यक अभियंता पदासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवली. या परीक्षेला 20 हजार 459 उमेदवार बसले होते. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विशिष्ट परीक्षा केंद्रांतील विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाल्याचे दिसून आले. ज्या उमेदवारांना मुंबई महापालिका, पुणे महापालिका, सिडको अथवा अन्य संस्थांच्या परीक्षेत अतिशय कमी गुण मिळाले, तेच उमेदवार एमएमआरडीएच्या परीक्षेत टॉपर ठरल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. परीक्षेतील काही गुणवंत उमेदवार हे नगरविकास विभागातील काही अधिकाऱयांशी संबंधित असल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षाने या भरती प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेतील गैरप्रकराच्या तक्रारींची चौकशी कारण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य म्हणून आयआयटी मुंबईचे प्राध्यापक डॉ. श्यामप्रसाद करगडे आणि दासका सत्यनारायण मूर्ती यांचा समावेश आहे. चौकशीसाठी समितीला विशिष्ट मुदत देण्यात आलेली नाही. मात्र समितीकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही करण्यात येणार नाही. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राधिकरणाकडून अहवालातील निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येईल, असे एमएमआरडीए स्पष्ट केले आहे.
तक्रारीसाठी तीस दिवसांची मुदत
सहाय्यक अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात ज्या उमेदवारांना तक्रार अथवा म्हणणे मांडायचे असेल त्यांनी 30 दिवसांत आपली तक्रार आवश्यक पुरावे आणि संबंधित कागदपत्रांसह [email protected] या ई-मेल आयडीवर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.