मतदार यादीत मनसे पदाधिकाऱ्याच्या फोटोसमोर बंगाली नाव, बहिणीचा तर धर्मच बदलला

मतदार यादीत असलेले घोळ दररोज समोर येत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख नावं दुबार आहेत. महानगरपालिकांच्या प्रारुप मतदार याद्यांबाबत हरकती नोंदवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा मतदार यादीतील एक गंभीर चूक समोर आणली आहे.

मनसेने शेअर केलेल्या मतदार यादीच्या फोटोत मनसेच्याच एका पदाधिकाऱ्याचा फोटो असून त्याच्या फोटो समोर चक्क दास मुटो सुकुमार असे बंगाली नाव लिहण्यात आले आहे. तर याच यादीत मनसे पदाधिकाऱ्याच्या बहिणीचा देखील फोटो असून तिच्या फोटो समोर शेख न्शा यालीम असे मुस्लीम नाव लिहण्यात आले आहे.

मनसेने याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ”मतदार यादीतील घोळ किती गंभीर आणि व्यापक स्तरावर आहे, याचं ठळक उदाहरण म्हणजे ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मतदार याद्यांमधील अनियमिततेविरोधात सातत्याने लढा दिला, त्याच मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या फोटोसमोर निवडणूक आयोगाने चक्क बंगाली नाव टाकले आहे, आणि त्यांच्या बहिणीचा तर चक्क धर्मच बदलून नोंदवला आहे. सरकारी कागदोपत्रीत एखाद्याच्या फोटोसमोर अनोळखी नाव दिसणे ही छोटी चूक नाही. हा सर्वसामान्य नागरिकासाठी किती मोठा धोका ठरू शकतो, याचा विचार सुज्ञ जनतेने नक्कीच करावा”, असे मनसेने पोस्ट केले आहे.

Comments are closed.