दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते, मनसेचा संताप

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात महाराष्ट्र नवनिर्मान सेनेकडून गेल्या 13 वर्षापासून दर दिवाळीला दीपोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील नेत्रदीपक रोषणाई आणि दररोज होणारी आतषबाजी हे या दीपोत्सवाचे आकर्षण आहे. हा दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून लोकं येत असतात. या दीपोत्सवाचे व्हिडीओ जगभरात शेअर होत असताना राज्य सरकारला देखील हा दीपोत्सवाचा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी देखील या दीपोत्सवाचा व्हिडीओ महाराष्ट्र टुरिझम या पर्यटन विभागाच्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे. मात्र यात त्यांनी मनसेला सौजन्य दिलेले नाही. त्यावरून मनसेने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. ”दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते”, असा टोला मनसेने त्यांच्या पोस्टमधून राज्य सरकारला लगावला आहे.

”महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील ‘दीपोत्सवाची’ काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे. दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे. हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील.पण जेव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः करत असल्यासारखं दाखवतं तेव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता. नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली. असो, पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो , आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं, अशी पोस्ट मनसेने शेअरकेली आहे.

Comments are closed.