बांगलादेश सीमेवर जमावाने सैनिकांवर हल्ला केला

रायफल हिसकावली, 8 जणांना अटक : चार जवान जखमी, सरकारी वाहनाचीही तोडफोड

वृत्तसंस्था, आगरतळा

भारत-बांगलादेश सीमेवर तस्करीविरोधी कारवाईदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर जमावाने हल्ला केल्याची घटना त्रिपुरातील सिपाहीजाला जिह्यात घडली. अशाबारी परिसरात सोमवारी झालेल्या या हल्ल्यात चार जवान जखमी झाले असून, त्यांच्याकडील रायफल हिसकावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.

अशाबारी सीमा चौकीवर तैनात असलेल्या बीएसएफच्या 49व्या बटालियनच्या जवानांना सीमेवर संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यांनी तस्करीच्या संशयावरून एका स्थानिक व्यक्तीला ताब्यात घेतले. संबंधित व्यक्तीला जवानांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी बॉक्सानगर-रहिमपूर रस्ता अडवून आंदोलन केले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहाय्यक कमांडंट रोहित कुमार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी जमावाने जवानांवर काठ्या आणि बांबूच्या काठ्यांनी हल्ला केला. त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. हल्लेखोरांनी एका जवानाची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.

आठ जणांना अटक; तपास सुरू

त्रिपुरा पोलिसांनी या प्रकरणात आठ जणांना अटक केली असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे. बीएसएफच्या तक्रारीवरून 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी जवानांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सुरक्षा दलांवरील हिंसाचार खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ बीएसएफ आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली.

तस्करीच्या संशयातून हिंसाचार

प्राथमिक माहितीनुसार, सीमेवर तस्करीच्या संशयावरून बीएसएफ जवान आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. त्यानंतर जमावाने जवानांवर हल्ला केला. मात्र, जवानांनी स्थानिक व्यक्तीला मारहाण केल्याच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे. या घटनेमागील नेमकी कारणे आणि हल्ल्यातील प्रत्येकाची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे भारत-बांगलादेश सीमेवरील तस्करीविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा प्रŽ पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 

Comments are closed.