IPL 2026: बंगळुरूमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मोबाईल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश! चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा धक्कादायक वापर
आयपीएल 2026 स्पर्धेला सुरुवात झाली असून 28 मार्च 2026, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या अनेक प्रेक्षकांनी त्यांचे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी बंगळुरूच्या कब्बन पार्क पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
त्यामध्ये पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, कर्नाटकबाहेरील एका टोळीने स्टेडियमच्या आत आणि बाहेर मोबाईल चोरी करण्यासाठी काही अल्पवयीन मुलांना कामावर ठेवले होते. पोलिसांनी या टोळीकडून 21 मोबाईल जप्त केले आहेत, ज्यांची किंमत सुमारे 18 लाख रुपये आहे.
बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी माहिती दिली की, चोरीचे विविध ब्रँडचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले असून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. तसेच या गुन्ह्यात सामील असलेल्या काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले असून, फरार असलेल्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.
बंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम गेल्या वर्षी (2025) वादात सापडले होते. आरसीबीने विजेतेपद पटकावल्यानंतर बंगळुरूमध्ये काढलेल्या ‘व्हिक्टरी परेड’ दरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्दैवी घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
या चेंगराचेंगरीनंतर बंगळुरूमध्ये सामने घेण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपचे सामनेही बंगळुरूऐवजी इतर शहरात खेळवण्यात आले. आयपीएलच्या 19 व्या हंगामात 2026 येथे सामने होणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या विशेष समितीने चौकशी पूर्ण करून अहवाल दिल्यानंतरच येथे पुन्हा सामने घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Comments are closed.