डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीला मोदींनीही प्रतिसाद दिला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारत-अमेरिका भागीदारीचे ‘सकारात्मक मूल्यांकन’ केल्याबद्दल खूप कौतुक केले. उपरती झाल्यागत वाटणाऱ्या ट्रंप यांनी दोन्ही राष्ट्रांमधील विशेष संबंधांचे कौतुक केल्यानंतर संबंधांमधील घसरण रोखण्याचा प्रयत्न म्हणून या टिप्पणीकडे पाहिले जाते.
व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी मोदींशी नेहमीच मैत्री राहील असे म्हटल्यानंतर काही तासांतच पंतप्रधानांनी सोशल मीडियावर टिप्पणी केली. परंतु या विशिष्ट क्षणी भारतीय नेते जे करत आहेत ते आपल्याला आवडत नाही, असेही ट्रंप यांनी स्पष्ट केलेले आहे. ‘राष्ट्रपती ट्रंप यांच्या भावना आणि त्यांनी केलेले आमच्या संबंधांचे सकारात्मक मूल्यांकन यांची मनापासून कदर करतो आणि त्यांना पूर्णपणे प्रतिसाद देतो’, असे मोदी यांनी म्हटले आहे. ‘भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक आणि पुढे जाणारी सर्वंकष तसेच जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे’, असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले.
17 जून रोजी फोनवर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांमध्ये मते व्यक्त होण्याची ही पहिलीच खेप होती. ट्रंप यांनी भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क दुप्पट करून 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर नवी दिल्ली आणि वॉशिंग्टनमधील संबंध मोठ्या प्रमाणात ताणले गेले आहेत. यामध्ये रशियातील कच्चे तेल भारत खरेदी करत असल्याने बसविण्यात आलेले 25 टक्के अतिरिक्त शुल्क समाविष्ट आहे. भारताने अमेरिकेच्या कृतीचे वर्णन अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव असे केले आहे.
मोदींशी नेहमीच मैत्री राहील : ट्रंप
त्यापूर्वी, अमेरिकेच्या भारताकडील संबंधांना पुन्हा चालना देण्याच्या शक्यतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रंप यांनी म्हटले होते की, दोन्ही देशांचे विशेष संबंध आहेत आणि काळजी करण्यासारखे काहीही नाही. ‘मी नेहमीच मोदींशी मैत्री करेन, ते एक महान पंतप्रधान आहेत, ते महान आहेत. मी नेहमीच मित्र राहीन. पण या विशिष्ट क्षणी ते जे करत आहेत ते मला आवडत नाही’, असे ते म्हणाले.
अमेरिका भारताला गमावून भारत चीनच्या दिशेने जात आहे अशा आशयाच्या गुऊवारी टाकलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल विचारले असता ट्रंप म्हणाले की, मला वाटत नाही की, तसे झालेले आहे. पण भारत रशियाकडून इतके तेल खरेदी करत आहे हे पाहून मला खूप निराशा झाली आहे आणि मी त्यांना जाणवून दिले की, आम्ही भारतावर खूप मोठा कर लावला आहे-50 टक्के कर, खूप जास्त कर. तुम्हाला माहिती आहेच की, मोदींशी माझे चांगले जुळते, ते काही महिन्यांपूर्वी येथे होते, असेही त्यांनी सांगितले.
मोदींची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी चर्चा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील संघर्ष लवकरात लवकर संपवण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीसह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. ‘राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्याशी खूप चांगली चर्चा झाली. आम्ही विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले. युक्रेनमधील संघर्ष लवकर संपवण्याच्या प्रयत्नांसह आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण केली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी जागतिक शांतता आणि स्थिरता वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असे पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
Comments are closed.