मोदी आणि पुतिन यांच्यात ऊर्जा आणि संरक्षणावर चर्चा झाली.

सुमारे 45 मिनिटे द्विपक्षीय बैठक : भारत मंडपम येथे इराणच्या नेत्यांशीही स्वतंत्र भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने सुमारे 45 मिनिटे द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, व्यापार आणि लोकांमधील संपर्क यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर, तसेच पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्राच्या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षांवर चर्चा केली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन-रशिया युद्ध संपवण्यासाठी भारत तयार असल्याचा शब्दही पुतीन यांना दिला. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात जागतिक हिताला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 12 आणि 13 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जागतिक नेते दाखल झाले आहेत. या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा आणि युगांडाच्या उपराष्ट्राध्यक्ष जेसिका अलुपो यांच्यासह 21 देशांचे प्रतिनिधी आणि सर्वोच्च नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका घेणार आहेत. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये नवी दिल्ली या ऐतिहासिक जागतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.

पुतीन यांना पुस्तक भेट

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना तामिळी संत तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुक्कुरळ’ या पुस्तकाचा रशियन अनुवाद भेट दिला. पुतीन यांना पुस्तक सादर करताना, पंतप्रधान मोदींनी पुस्तकाविषयी माहिती देत हे पुस्तक आपले सांस्कृतिक संबंध दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील असे स्पष्ट केले. तिरुक्कुरळ हा तामिळी साहित्यातील एक महान आणि जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. याला ‘तामिळी वेद’ म्हणूनही ओळखले जाते. रशियनसह अनेक भाषांमध्ये याचे भाषांतर झाले आहे. हे पुस्तक मानवी मूल्यांवर आधारित आहे. हा ग्रंथ तामिळी साहित्यातील एक असाधारण आणि व्यापकपणे प्रशंसित कलाकृती मानला जातो.

पुतीन भेटीवर मोदींची आनंददायी पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. बिश्केक येथील त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत दिल्लीत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत व्यापारी संबंध अधिक दृढ करणे, आर्थिक सहकार्य कार्यक्रम 2030 ची अंमलबजावणी करणे, तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण, संस्कृती आणि इतर क्षेत्रांमधील सहकार्यावर चर्चा झाल्याचे मोदींनी सोशल मीडियावर स्पष्ट केले.

मोदी-पेझेश्कियान यांची स्वतंत्र बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यातही भारत मंडपम येथे द्विपक्षीय चर्चा झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या काळात या दोन नेत्यांमधील ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण जगाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात होते. या बैठकीत भारत-इराण संबंध आणि परस्पर सहकार्याशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Comments are closed.