युक्रेन युद्धाबद्दल मोदी सरकारची भूमिका योग्य आहे
रशिया-युक्रेन युद्धाच्या 3 वर्षांनी थरूर यांना चुकीची जाणीव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन यांच्यात 2022 मध्ये युद्ध सुरू झाले होते जे अद्याप सुरू आहे. पूर्ण जगात रशिया-युक्रेन युद्धावरून खळबळ उडाली असताना काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यावेळी भारताच्या भूमिकेचे सर्वात मोठे टीकाकार ठरले होते. तेव्हा त्यांनी भारताच्या भूमिकेवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. आता तीन वर्षांनी त्यांनी याप्रकरणी स्वत:ची चूक मान्य केले आहे. रशिया-युक्रेन युद्धावरून 2022 मध्ये जी भूमिका मी स्वीकारली होती, ती योग्य नव्हती असे थरूर यांनी मंगळवारी रायसीना डायलॉगमध्ये बोलताना म्हटले आहे.
रशिया-युक्रेन युद्धावर भारताने मौन बाळगणे युक्रेन आणि त्याच्या समर्थकांसाठी निराशाजनक असेल. रशिया भारताचा मित्र आहे आणि त्याच्या काही वैध सुरक्षा चिंता असू शकतात. परंतु भारताने या मुद्द्यावर मौन बाळगणे दुर्दैवी आहे, असे थरूर यांनी संसदेत म्हटले होते.
मान्य केली चूक
रशिया-युक्रेन युद्धावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका पाहता भारताने त्यावेळी स्वीकारलेली भूमिका योग्य होती का असा प्रश्न थरूर यांना रायसीना डायलॉगमध्ये विचारण्यात आला. तीन वर्षांनी माझ्या मागील भूमिकेबद्दल मला खेद आहे. त्यावेळी मी घेतलेली भूमिका योग्य नव्हती. फेब्रुवारी 2022 मध्ये संसदेतील चर्चेत भारताच्या भूमिकेवर टीका करणारा मी एकटाच होतो. रशियाचे आक्रमण संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्राचे उल्लंघन आहे. सीमांचे अखंडत्व आणि एका सदस्य देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचे मी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्यासाठी बळाचा वापर अस्वीकारार्ह असल्याचे आम्ही नेहमीच मानत आलो आहोत असे थरूर यांनी नमूद केले.
तीन वर्षांनी मीच मुर्ख ठरल्याचे वाटत आहे. स्पष्ट स्वरुपात संबंधित धोरणाचा अर्थ भारताकडे एक असा पंतप्रधान आहे जो 14 दिवसांच्या कालावधीत युक्रेनचे अध्यक्ष आणि रशियाच्या राष्ट्रपतींची गळाभेट घेऊ शकतो. त्या धोरणामुळेच भारत स्थायी शांततेसाठी स्वत:ची भूमिका पार पाडू शकतो. आम्ही युरोपमध्ये नाही आणि आम्हाला या युद्धामुळे थेट स्वरुपात कुठलाच धोका नाही. तेथील क्षेत्रीय सीमांमध्ये बदल झाल्याने आम्हाला कुठलाच लाभ नाही असे थरूर यांनी म्हटले आहे.
भारत शांतिसैनिक पाठविणार का?
युक्रेनमध्ये शांतिसैनिक पाठविण्याचा निर्णय अनेक गोष्टींवर निर्भर असेल. रशिया आणि युक्रेन शांततेसाठी तयार आहेत का हे पहावे लागेल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य देखील महत्त्वाचे असेल. भारत सरकारला यासंबंधी निर्णय घेण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील. भारताने यापूर्वी जगभरात लाखो शांतिसैनिक पाठविले आहेत. भारताने सुमारे 49 शांतता अभियानांमध्ये भाग घेतला असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
Comments are closed.