मोदींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली, आता राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे – संजय राऊत

देशाच्या पंतप्रधानांनी वाढदिवशी देशाच्या राजधानीत असणं गरजेचं असतं. पण मोदींचा देश हा गुजरातपुरता मर्यादीत आहे, त्यांना गुजरातच्या सीमेपलीकडचा देश दिसत नाही, अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी मुंबईमध्ये बोलताना केली. मोदी वाढदिवसाला गुजरातमध्ये आहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले.

नरेंद्र मोदींनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे आणि सामाजिक कार्यासाठी पुढील जीवन दिलं पाहिजे. पंचाहत्तर वर्षांचं वय हे काही देशाचं नेतृत्व करण्याचं वय नाही आणि त्यांच्या पक्षात ज्या बंडाळ्या सुरू आहेत सध्या त्या त्यांना थांबवता येत नाही. त्यांनी भरपूर सेवा केली आहे. आता या देशाचं नेतृत्व योग्य व्यक्तीकडे सोपवणं हा त्यांचा संकल्प असायला पाहिजे, असेही यावेळी राऊत म्हणाले.

याविषयावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, सध्या मोदींची प्रकृती कशी आहे हे मला माहित नाही. पण देशाची प्रकृती मात्र बिघडली आहे. देशाची प्रकृती बदलायची असेल तर देशाच्या नेतृत्वात बदल होण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो. नक्कीच आत्तापर्यंत त्यांनी देशाला जे योगदान दिलं असे त्यांची लोक म्हणतात याबाबत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.

एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, त्यांचा जो गट आहे तो नरेंद्र मोदींचाच गट आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रमुखांना भेटायला त्यांना गुजरातला जावंच लागणार. त्यांच्या पक्षाचं मुख्यालय गुजरातमध्येच आहे. आमचं जसं पक्षाचं मुख्यालय दादर शिवसेना भवन आहे मातोश्री आहे. तसं त्यांच्या पक्षाचं मुख्यालय हे अहमदाबादला म्हणजेच गुजरातला आहे.

एकनाथ शिंदे यांनी गुजराती भाषेत जाहिरात दिली असल्याचे माध्यमांनी राऊत यांना विचारल्यावर राऊत म्हणाले, यावरूनच समजतं की त्यांची शिवसेना आहे ती खोटी आणि भंपक आहे. ते म्हणतात मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा वारसदार आहे. आता मात्र त्यांनी सिद्ध करून दाखवलं ते बाळासाहेबांचे वारसदार नाहीत. त्यांचे नेते मोदी आणि शहा आहेत बाळासाहेब ठाकरे नाहीत.

मराठवाड्यातील आंदोलनावर बोलताना राऊत म्हणाले, दुष्काळमुक्तीची आश्वासने देवेंद्रजींनी वारंवार दिली, तसेच कॅबिनेट घेतल्या. संभाजीनगरला आतापर्यंत त्यांनी मराठवाड्याला सातशे साठ आश्वासने दिलेली आहेत. ही आश्वासने पूर्ण नाही झालीत म्हणून आज मराठवाड्यात हे आंदोलन शिवसेनेतर्फे अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय म्हणतात याच्यावर आता कोण विश्वास ठेवत नाही. कर्जमुक्त करणार, दुष्काळमुक्त करणार, अमूक करणार तमुक करणार, महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करणार पण होतंय का? नाही. फक्त बोलताहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं यावर माध्यमांनी प्रश्न विचारला. या प्रश्नावर राऊत म्हणाले, सरकारने समाधान केलं असेल आणि त्यांचं समाधान झालं असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आम्हाला चिंता होती, गेले काही दिवस ते उपोषण ते करताहेत त्यांची प्रकृती खूप खालावली होती. त्यामुळे तात्पुरती ही लढाई थांबली असेल आणि तीन महिन्यांची मुदत सरकारने दिली असेल तर जबाबदारी सरकारवर आहे. याच मुद्द्यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, कॅबिनेटमध्ये मंत्र्यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली असेल तर मग त्यांचे बूट चाटायला का गेले? याचा अर्थ जरांगे यांचे आंदोलन सरकारसाठी अत्यंत चिंताजनक ठरलं. अडचणीचं ठरलं. मग रातोरात त्यांच्या पायाशी का गेलात? तुम्ही कॅबिनेटमध्ये त्यांच्या विरोधात भूमिका मांडता प्रकरण अंगलट आलं की जाऊन त्यांच्या पायाशी बसता. सरकार दुटप्पीपणे वागत असल्याची टीका यावेळी राऊतांनी केली.

Comments are closed.