ख्रिसमसच्या निमित्ताने मोदींनी कॅथेड्रल चर्चला भेट दिली.

ख्रिस्ती बांधवांना दिल्या सोशल मीडियावरून शुभेच्छा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशभरात गुरुवारी ख्रिसमस साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीच्या कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे ख्रिसमसच्या सकाळच्या प्रार्थनेला उपस्थिती दर्शवली. या सेवेदरम्यान प्रार्थना आणि कॅरोल सादर करण्यात आले. दिल्लीचे बिशप रेव्हरंड डॉ. पॉल स्वरूप यांनी पंतप्रधान मोदींसाठी विशेष प्रार्थना केली. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी देशभरातील ख्रिस्ती नागरिकांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सर्वांना शांती, करुणा आणि आशेने भरलेल्या नाताळाच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी आपल्या समाजात सुसंवाद बळकट करोत.’ असा संदेश त्यांनी ट्विट केला. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीदेखील एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी आणो असे राहुल गांधींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून, पंतप्रधान मोदी नियमितपणे ख्रिश्चन समुदायाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. 2023 मध्ये त्यांनी ख्रिसमसच्या दिवशी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी एक कार्यक्रम आयोजित केला होता. 2024 मध्ये त्यांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या घरी रात्रीच्या जेवणाला उपस्थिती लावली होती. तसेच त्यांनी कॅथोलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमातही भाग घेतला होता.

Comments are closed.