मोदी यूएनच्या जनरल असेंब्लीच्या चर्चेत भाग घेणार नाहीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेत बोलणार नाहीत, असे जारी करण्यात आलेल्या वक्त्यांच्या सुधारित यादीवरून स्पष्ट झाले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे 80 वे अधिवेशन 9 सप्टेंबर रोजी सुरू होईल.
उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चा 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार असून ब्राझील हा पारंपरिक पद्धतीनुसार पहिला वक्ता असेल आणि त्यानंतर अमेरिका असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 23 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. हे त्यांच्या व्हाईट हाऊसमधील दुसऱ्या कार्यकाळातील संयुक्त राष्ट्रांच्या सत्रातील पहिले भाषण असेल. शुक्रवारी जाहीर झालेल्या 80 व्या महासभेच्या उच्चस्तरीय सर्वसाधारण चर्चेसाठीच्या वक्त्यांच्या सुधारित तात्पुरत्या यादीनुसार, भारताचे प्रतिनिधीत्व एक ’मंत्री’ करतील.
Comments are closed.