आसियानमध्ये मोदींची आभासी उपस्थिती
पूर्व आशियाई शिखर परिषदेला एस. जयशंकर रवाना होणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी 22 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होतील. याप्रसंगी ते भारत-आसियान संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतील आणि धोरणात्मक भागीदारी कशी आणखी मजबूत करायची यावर चर्चा करतील. आसियानशी संबंध मजबूत करणे हे भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी आणि आमच्या इंडो-पॅसिफिक व्हिजनचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून ही शिखर परिषद होत आहे. तथापि, यावेळी पंतप्रधानांच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल राजनैतिक वर्तुळात बरीच अटकळ बांधली जात आहे. पंतप्रधान मोदी ‘आसियान’मध्ये उपस्थित राहिले नाहीत,
तर पराराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर उपस्थित राहतील का? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तथापि, 27 ऑक्टोबर रोजी क्वालालंपूर येथे होणाऱ्या 20 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर भारताचे प्रतिनिधित्व करतील. हा मंच इंडो-पॅसिफिक प्रदेशाच्या स्थिरता, सुरक्षा आणि समृद्धीवर लक्ष केंद्रित करतो. या परिषदेला चीन, अमेरिका, जपान आणि आसियान देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील. आसियान शिखर परिषदेनंतर 27 ऑक्टोबर रोजी मलेशियामध्ये होणाऱ्या पूर्व आशिया शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होतील. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात एक महत्त्वाची द्विपक्षीय बैठक होऊ शकते अशी अटकळ होती, परंतु आता मोदी यांच्या आभासी सहभागाच्या घोषणेमुळे या दोन्ही नेत्यांमधील भेट दुरापास्त असल्याचे मानले जात आहे.
आसियान शिखर परिषद
‘आसियान’ हा आग्नेय आशियातील 10 देशांचा गट आहे. त्याला आग्नेय आशियाई राष्ट्रांची संघटना म्हणतात. त्यात इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार, कंबोडिया आणि ब्रुनेई यांचा समावेश आहे. आसियानची स्थापना 8 ऑगस्ट 1967 रोजी झाली असून त्याचे मुख्यालय इंडोनेशियातील जकार्ता येथे आहे. सदस्य देशांमध्ये आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे. या शिखर परिषदेत फक्त या 10 देशांचे नेते सहभागी होतात. भारत आसियानचा सदस्य आणि एक संवाद भागीदार आहे. आसियान देश हे भारताच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहेत.
पूर्व आशिया शिखर परिषद
पूर्व आशिया शिखर परिषद ही आसियानमध्ये आणखी आठ देशांना जोडून तयार केलेली एक मोठी बैठक आहे. त्यात भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचाही समावेश आहे. एकूण 18 देश सहभागी होतात. 2005 मध्ये याची सुरुवात झाली आणि प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि आर्थिक भागीदारीला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे. ही बैठक आसियानद्वारे आयोजित केली जात असल्यामुळे पूर्व आशिया शिखर परिषद सहसा आसियान शिखर परिषदेसोबत किंवा लगेचच आयोजित केली जाते. यंदा भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्यात सहभागी होत आहेत.
Comments are closed.