Asia Cup 2025: मोहसिन नकवी यांनी बीसीसीआयच्या चेतावणीवरती केला जबरदस्त पलटवार, म्हणाले….
बीसीसीआयच्या इशाऱ्यानंतरही आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पुन्हा एकदा भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी देण्यास नकार दिला आहे. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षदेखील आहेत. त्यांनी एक प्रेझेंटेशन सेरेमनी आयोजित करण्याची सूचना दिली आहे. नकवी म्हणाले की, या समारंभात बीसीसीआयला हवे असल्यास त्यांच्या कोणत्याही खेळाडूला ट्रॉफी स्वीकारण्यासाठी पाठवता येईल.
बीसीसीआयने अलीकडेच मोहसिन नकवी यांना पत्र लिहून भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी देण्याची मागणी केली होती, मात्र नकवी यावर झुकण्यास तयार नाहीत.
न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेतील (ACC) सूत्रांनी सांगितले की बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, उपाध्यक्ष राजीव शुक्ला तसेच श्रीलंका आणि अफगाणिस्तानसह इतर देशांच्या क्रिकेट बोर्डांनीही गेल्या आठवड्यात एसीसी अध्यक्ष मोहसिन नकवी यांना पत्र लिहून भारतीय संघाला आशिया कप ट्रॉफी देण्याची विनंती केली होती.
या अहवालात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की मोहसिन नकवी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नकवी यांची इच्छा आहे की बीसीसीआयने आपला एखादा प्रतिनिधी दुबईला पाठवावा आणि त्यांच्या हस्तेच ट्रॉफी स्वीकारावी. दुसरीकडे, बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की त्यांच्या संघातील किंवा भारतीय संघातील कोणताही सदस्य नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, आता या प्रकरणावर अंतिम निर्णय कदाचित आयसीसीच्या बैठकीत घेतला जाईल.
आशिया कपची ट्रॉफी सध्या दुबईतील एसीसीच्या कार्यालयात ठेवलेली आहे. अहवालांनुसार, मोहसिन नकवी यांनी कडक आदेश दिले आहेत की त्यांच्या अनुपस्थितीत किंवा त्यांच्या परवानगीशिवाय आशिया कपची ट्रॉफी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार नाही.
Comments are closed.