‘ते पाकिस्तानचा अपमान करतात..’, भारतीय दिग्गजांवर मोहम्मद आमीरचा संताप! नेमकं प्रकरण काय?

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने (Mohmmed Amir) पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटपटूंबाबत वादग्रस्त विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय चाहते चांगलेच संतापले आहेत. काही दिवसांपूर्वी आमीरने भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) ‘स्लॉगर’ (केवळ टोलवा-टोलवी करणारा) म्हटले होते. तसेच, भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमीफायनलपर्यंत पोहोचणार नाही, असे भाकीतही त्याने वर्तवले होते. यावरून भारतीयांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले.
आता या सर्व वादावर आमीरने आपली बाजू मांडली असून भारतीयांवरच निशाणा साधला आहे.
पाकिस्तानी शो ‘हंसना मना है’ मध्ये बोलताना आमीर म्हणाला, मी फक्त माझे मत मांडले आहे. जेव्हा भारतीय संघ चांगली कामगिरी करतो, तेव्हा आम्ही त्यांचे कौतुकही केले आहे. लोकांनी इतरांच्या मतांचा आदर करायला हवा. जर मी काही माजी भारतीय क्रिकेटपटूंबद्दल बोललो, तर ते अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतात. ते पाकिस्तानचा अपमान करतात आणि शिव्या देतात. आम्ही कधीही असे केलेले नाही. मी भारताच्या विरोधात कधी अपशब्द वापरल्याचे एक तरी उदाहरण दाखवून द्या.
अभिषेक शर्माबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण देताना आमीर म्हणाला, मी फक्त एवढेच म्हटले होते की, अभिषेकचा ‘डिफेन्सिव्ह गेम’ (चेंडू रोखण्याचे तंत्र) चांगला नाही. जो खेळाडू चेंडू व्यवस्थित रोखू शकत नाही, त्याला मी दुसरं काय म्हणणार? जर त्याला चेंडू डिफेंड करता येत नसेल, तर त्याला ‘स्लॉगर’ म्हणणे चुकीचे कसे?”
भारतीय संघ सेमीफायनल गाठणार नाही, या आपल्या विधानावर आमीर ठाम आहे. तो म्हणाला, जगात प्रत्येकाचे मत सारखे असू शकत नाही. आम्ही हे क्रिकेट खूप जवळून खेळलो आहोत, त्यामुळे हे खेळ कसे चालतात याची आम्हाला कल्पना आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) या दोन्ही संघांच्या खेळण्याच्या पद्धतीची तुलना केली, तर सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ जास्त सरस वाटतो.
Comments are closed.