मोहम्मद कैफ संतापले, टी20 विश्वचषक संघ निवडीवर दिले ‘हे’ मोठे विधान!
भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ यांनी टी20 विश्वचषक 2026 च्या तयारीसाठी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आखलेल्या रणनीतीवर कडक शब्दांत टीका केली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कैफ म्हणाले की, शुभमन गिलला टी20 संघात परत आणण्याची गरज नव्हती, कारण भारताकडे या फॉरमॅटसाठी यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यासारखे अधिक चांगले पर्याय उपलब्ध होते. गिलची निवड करणे ही निवडकर्त्यांची मोठी चूक असून या निर्णयामुळे भारतीय टी20 संघ किमान दोन ते तीन महिने मागे फेकला गेला आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
यासोबतच, अक्षर पटेलकडून उपकर्णधारपद काढून ते शुभमन गिलला देण्याच्या निर्णयावरही कैफ यांनी ताशेरे ओढले. त्यांच्या मते, या बदलामुळे अक्षरने ते महत्त्वाचे महिने गमावले ज्या काळात तो सूर्यकुमार यादवसोबत राहून आपली नेतृत्वक्षमता अधिक प्रगल्भ करू शकला असता. जर तो उपकर्णधार पदावर कायम असता, तर त्याला संघ बैठकींद्वारे खेळाडूंना अधिक जवळून समजून घेता आले असते. भविष्यात जर सूर्यकुमारला दुखापत झाली, तर अशा वेळी नेतृत्वाचा अनुभव असलेल्या अक्षरची उणीव भासू शकते, असा इशाराही कैफ यांनी दिला आहे.
कैफ पुढे म्हणाले की, “जर अक्षर पटेलला नेतृत्व करावे लागले असते, तर तो अधिक चांगल्या प्रकारे तयार असता; परंतु त्याच्याकडून ती संधी हिरावून घेण्यात आली.” कैफ यांच्या मते, शुभमन गिलला टी20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्य असला तरी तो घेण्यास खूप उशीर झाला. हे निवडकर्त्यांच्या खराब रणनीतीचे लक्षण असून, नियोजनाच्या नावाखाली केवळ वेळेचा अपव्यय करण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली.
आशिया चषक 2025 पूर्वी शुभमन गिलला टी20 फॉरमॅटचा उपकर्णधार बनवण्यात आले होते आणि संजू सॅमसनच्या जागी अभिषेक शर्मासोबत त्याच्याकडून सलामीही करून घेतली होती. मात्र, गिल निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरू शकला नाही. परिणामी, त्याला टी20 विश्वचषक 2026 च्या संघातून वगळून त्याच्या जागी इशान किशनचे पुनरागमन झाले आहे, तर अक्षर पटेलला पुन्हा एकदा उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
Comments are closed.