चेंडू दिसत नाहीये म्हणणाऱ्या नबीचा ‘तो’ आगाऊपणा बोर्डाला खटकला, ICCची कारवाई, नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान: टी-20 विश्वचषक 2026 मधील 13वा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात अहमदाबाद येथे रंगला. हा सामना अत्यंत रोमांचक ठरला आणि निकालासाठी तब्बल दोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या. अखेरीस दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत दोन गुणांची कमाई केली.

मोहम्मद नबीवर आयसीसीची कारवाई (Mohammad Nabi Fined)

या सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार मोहम्मद नबी याचा पंचांसोबत वाद झाला. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने त्याच्यावर सामन्याच्या मानधनाच्या 15 टक्के दंडाची कारवाई केली. ही घटना अफगाणिस्तानच्या डावातील 14व्या षटकात घडली. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी गोलंदाजीसाठी आला असताना त्याच्या मनगटावर बांधलेल्या पिवळ्या रंगाच्या रिस्टबँडवरून नबीने आक्षेप घेतला.

रिस्टबँडवरून वाद अन् आता कारवाई….

नबीचे म्हणणे असे होते की, लुंगी एनगिडीने घातलेला चमकदार पिवळा रिस्टबँड चेंडूच्या रंगाशी साधर्म्य राखत असल्याने चेंडू नीट दिसत नाही आणि फलंदाजी करताना अडचण येते. त्यामुळे त्याने पंचांकडे रिस्टबँड काढण्याची मागणी केली. मात्र पंचांनी नबीचा युक्तिवाद पूर्णतः मान्य केला नाही. यामुळे नबी आणि पंचांमध्ये वाद झाला. या वादात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही सहभागी झाले आणि काही काळ मैदानावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कर्णधार एडेन मार्करमने हस्तक्षेप करून नबीला शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पंचांच्या आदेशानंतर खेळ पुन्हा सुरू झाला, मात्र लुंगी एनगिडीने रिस्टबँड काढला नाही.

आचारसंहितेचे उल्लंघन

पंचांच्या निर्णयावर सार्वजनिकरीत्या आक्षेप घेतल्यामुळे नबीने आयसीसी आचारसंहितेच्या लेव्हल-1 नियमांचे उल्लंघन केल्याचे ठरवण्यात आले. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की नबीने आपली चूक मान्य केली असून आयसीसी आंतरराष्ट्रीय सामना पंच पॅनलचे डेविड गिल्बर्ट यांनी सुचवलेली शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. गेल्या 24 महिन्यांतील हा त्याचा पहिलाच गुन्हा असल्याने त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा –

T20 World Cup 2026 Points Table : टी-20 वर्ल्ड कप 2026 पॉइंट्स टेबलमध्ये खळबळ! अफगाणिस्तान OUT?, ग्रुप A मध्ये भारत–पाकिस्तान कुठे?

आणखी वाचा

Comments are closed.