मोहम्मद शमी निवड समितीच्या रडारवर, संघात पुनरागमनासाठी हालचाली सुरू! 'या' मालिकेतून होणार एन्ट्री?

बऱ्याच काळापासून टीम इंडियाबाहेर (Team india) असलेल्या मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) आता त्याच्या घरगुती क्रिकेटमधील (Domestic Cricket) दमदार कामगिरीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआय (BCCI) सूत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, 35 वर्षीय शमी पुन्हा एकदा निवड समितीच्या नजरेत आला असून लवकरच तो निळ्या जर्सीत दिसू शकतो.

बीसीसीआयच्या सूत्रांनी ‘एनडीटीवी’ला सांगितले की, शमीच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तो निवडीच्या शर्यतीतून बाहेर नाही, फक्त त्याची फिटनेस ही एकमेव चिंतेची बाब आहे. शमी ज्या क्षमतेचा गोलंदाज आहे, ते पाहता त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संधी दिली जाऊ शकते. इतकेच नाही, तर त्याचा अनुभव लक्षात घेता 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी देखील त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो.

2024 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी एकही सामना खेळलेला नाही. 2023 पासून तो कसोटी संघाबाहेर आहे. मध्येच त्याच्या फिटनेसवरून निवड समिती आणि त्याच्यात काही मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

निवड समितीने जेव्हा शमीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले होते, तेव्हा शमीने स्पष्टपणे सुनावले होते की, फिटनेसची अपडेट देणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीए (NCA) मध्ये जाऊन तयारी करणे आणि सामने खेळणे हे आहे. अपडेट कोणी दिली किंवा कोणी नाही, ही माझी जबाबदारी नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमी भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याची विकेट घेण्याची क्षमता आणि दांडगा अनुभव पाहता, तो फिट असल्यास त्याला संघात स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे.

Comments are closed.