मुस्लिम खेळाडूंवरच ट्रोल्सचा जास्त निशाणा साधला जातो का? मोहम्मद शमीचे ठाम उत्तर
टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खेळ आणि आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आले की, मुस्लिम क्रिकेटरांना ट्रोल्स जास्त टार्गेट करतात का? यावर उत्तर देताना शमी म्हणाला की, अशा गोष्टींवर तो अजिबात लक्ष देत नाहीत. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया मिळतात, हे त्याने स्पष्ट केले.
न्यूज 24 शी बोलताना शमी म्हणाला, “मी अशा प्रकारच्या ट्रोलिंगकडे लक्षच देत नाही. मला एक काम दिलं आहे. मी मशीन नाही. जर मी वर्षभर कष्ट करतो, तर कधीकधी अपयशीही होईन, तर कधी यशस्वी होईन. हे लोकांच्या हातात असतं की ते त्याकडे कसं पाहतात.”
शमी पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा बाकी सगळं विसरावं लागतं. विकेट घेणं आणि सामना जिंकणं याला अधिक महत्त्व असतं. त्या क्षणी मी सोशल मीडियावर जायला इच्छुक नसतो. तिथे पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्ही कमेंट्स असतात. खेळताना अशा गोष्टींपासून दूर राहणं आवश्यक आहे.”
त्याने पुढे सांगितलं, “आम्ही यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करतो. पण ट्रोल्सना फक्त दोन ओळी टाईप करायच्या असतात. खरा चाहता कधीही अशा गोष्टी करणार नाही. तुम्हाला काही आक्षेप असतील तर नक्की मांडावेत-पण आदरपूर्वक. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही माझ्यापेक्षा चांगलं करू शकता, तर प्लीज या आणि प्रयत्न करून दाखवा. दार नेहमी उघडं आहे.”
मोहम्मद शमी हा टीम इंडियाचा चॅम्पियन गोलंदाज आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतही त्याने 9 विकेट्स घेत भारतासाठी संयुक्तरीत्या सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. त्याच्या नावावर टेस्ट आणि वनडे या दोन्ही स्वरूपात 200 पेक्षा जास्त विकेट्स आहेत. इतक्या भव्य कामगिरीनंतरही शमी ट्रोल्सच्या निशाण्यावर आला होता. 2021 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर शमीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. काही पोस्टमध्ये त्याच्यावर “गद्दार” आणि “देशविरोधी” अशा लाजिरवाण्या प्रतिक्रिया दिल्या गेल्या होत्या.
Comments are closed.