मी कुणासाठीही खेळण्यास तयार, मोहम्मद शमीचा निर्धार
हिंदुस्थानचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी आयपीएलच्या लिलावापूर्वी चर्चेत आला आहे. आयपीएल 2025 हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर त्याच्या संघातील स्थानाबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. मात्र या स्थितीत शमीने स्पष्ट केले आहे की, मी कुठल्याही संघासाठी खेळण्यास तयार आहे, जो मला संधी देईल. त्याच्या या प्रतिक्रियेनंतर तो हैदराबादकडून मुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळाले आहेत
निराशाजनक हंगाम
मेगा लिलावात तब्बल 10 कोटी रुपयांत सनरायझर्सने खरेदी केलेल्या शमीला 2025 हंगामात फारसे यश लाभले नाही. त्याने 9 सामन्यांत केवळ 6 विकेट मिळवले, तेही 56.16 च्या सरासरीने. त्यामुळे संघ आणि चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अपयशी कामगिरीनंतर शमी म्हणाला, हे माझ्या हातात नाही. आयपीएल हा क्रिकेटचा उत्सव आहे. लोकांसाठी हा खेळ मनोरंजन आहे. ज्या संघाने माझ्यासाठी बोली लावली, त्याच्यासाठी मी खेळायला तयार आहे.
गुजरातमधील सुवर्णक्षण
शमीचा सर्वोत्तम काळ 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून गेला. त्या हंगामात त्याने 17 सामन्यांत 28 विकेट घेत ‘पर्पल पॅप’ जिंकली. 2022 मध्येही त्याने विजेतेपद मिळवलेल्या गुजरातसाठी 20 विकेट उखडले होते, मात्र 2024 मध्ये दुखापतीमुळे त्याला फार खेळता आले नाही. त्यानंतर गुजरातने त्याला मुक्त केले.
आगामी लिलावाची उत्सुकता
आता आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात कोणता संघ शमीवर विश्वास ठेवतो, हे पाहणे सर्व चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. शमीचा फॉर्म नसला तरी त्याला आपल्या संघात खेचण्यासाठी अनेक फ्रेंचाईजी उत्सुक आहेत.
आयपीएल प्रवास
शमीने आतापर्यंत पाच वेगवेगळय़ा आयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
2013 – कोलकाता नाईट रायडर्सकडून पदार्पण
2014-2018 – दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताचे दिल्ली पॅपिटल्स)
2019-2021 – किंग्ज इलेव्हन पंजाब (आताचे पंजाब किंग्ज) – 42 सामन्यांत 58 बळी
2022-2023 – गुजरात टायटन्स – 2 हंगाम गाजवले
2025 – सनरायझर्स हैदराबाद
आजवर त्याने एकूण 119 आयपीएल सामने खेळले असून 133 बळी मिळवले आहेत. त्याची सरासरी 28.18 इतकी आहे.
Comments are closed.