मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
कोलकाता: भारतीय संघान मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी सामने खेळले तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळाली नव्हती. मात्र,रणजी स्पर्धेत मोहम्मद शमीनं बंगालकडून खेळताना गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या आहेत.यामुळं बंगालनं रणजी स्पर्धेत दुसरा सामना जिंकला. शमीनं दोन्ही सामन्यात मिळून 15 विकेट घेतल्या आहेत आता दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संधी मिळणार का हे पाहावं लागेल.
Mohammed Shami : शमीच्या रणजीत 15 विकेट
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर मोहम्मद शमी फिट नसल्यानं त्याची निवड झाली नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मोहम्मद शमीनं तो जर फिट नसेल तर त्यानं बंगालकडून देखील खेळलं नाही पाहिजे, असं म्हटलं होतं. जर चार दिवसांचे सामने खेळू शकतो तर 50 ओव्हरची मॅच खेळू शकतो असं वक्तव्य मोहम्मद शमीनं केलं होतं.
मोहम्मद शमीनं बंगालकडून गुजरात विरुद्ध खेळताना 8 विकेट घेतल्या आहेत. शमीनं पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. ही मॅच बंगालनं 141 धावांनी जिंकली. पहिल्यांदा फलंदाजी करताना बंगालनं 279 धावा केल्या होत्या. गुजरातचा संघ पहिल्या डावात 167 धावांवर बाद झाला. मोहम्मद शमीनं पहिल्या डावात गुजरातच्या तीन विकेट घेतला. तर, बंगालनं दुसऱ्या डावात 8 बाद 214 धावांवर डाव घोषित केला. यामुळं गुजरातला विजयासाठी 327 धावा करायच्या होत्या. मोहम्मद शमीनं दुसऱ्या डावात गुजरातच्या 5 विकेट घेतल्या. यामुळं गुजरातचा संघ 185 धावांवर बाद झाला. प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार गुजरातच्या शाहबाज अहमदला दिला गेला. त्यानं मॅचमध्ये दोन्ही डावात मिळून 9 विकेट घेतल्या. त्यानं पहिल्या डावात बंगालच्या 6 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या.
शमीच्या 2 मॅचमध्ये 15 विकेट
रणजी ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजमध्ये बंगालनं सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत.12 गुणांसह क गटात पश्चिम बंगाल तिसऱ्या स्थानावर आहे. मोहम्मद शमीनं उत्तराखंड विरुद्ध पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या होत्या. तर, गुजरात विरुद्ध शमीनं पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या.
भारत ऑस्ट्रेलियातील टी 20 मालिका संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघातील दावेदारी शमीनं भक्कम केली आहे. दरम्यान निवड समिती सदस्य आर. पी. सिंग यानं मोहम्मद शमीची भेट घेतल्याचं देखील कळतंय.
आणखी वाचा
Comments are closed.