सिराजचा दबदबा! 2025मध्ये कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत अव्वल स्थानी झेप
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे. वेस्टइंडिजविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने एकूण 10 विकेट्स घेतल्या आणि यासह त्याच्या खात्यात एकूण 8 कसोटीत 37 बळी जमा झाले आहेत. या कामगिरीनंतर त्याने झिम्बाब्वेचा गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला मागे टाकत आघाडी मिळवली.
ब्लेसिंग मुजरबानीने 2025 मध्ये आतापर्यंत 9 कसोटीत 36 विकेट्स घेतल्या आहेत. एका डावात 7 बाद 58 अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. मात्र सिराजच्या अलीकडच्या प्रदर्शनामुळे तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी पेसर मिचेल स्टार्क सध्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 7 कसोटीत 29 विकेट्स घेतल्या असून त्यातील सर्वोत्तम कामगिरी वेस्टइंडिजविरुद्ध 6 बाद 9 अशी होती. तो लवकरच इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या एशेज मालिकेत सहभागी होणार आहे, ज्याची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून होणार आहे.
वेस्टइंडिजचा फिरकीपटू जोमेल वार्रिकनने 6 कसोटीत 24 बळी घेतले आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने 5 बळी घेतले असून एका डावात 7 बाद 32 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
यादीतील पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नाथन लायन आहे. त्यानेही 6 कसोटीत 24 विकेट्स घेतल्या असून एशेज मालिकेत तो महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.
मोहम्मद सिराजची ही सातत्यपूर्ण कामगिरी भारतीय संघासाठी मोठा दिलासा ठरत आहे. जसप्रीत बुमराहसारख्या मुख्य गोलंदाजाच्या अनुपस्थितीत सिराजने नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. त्याची ही टॉप स्थानावरील घोडदौड आगामी कसोटी मालिकांसाठी भारतासाठी मोठा आत्मविश्वास निर्माण करणारी ठरू शकते.
Comments are closed.