VIDEO: टी20 चॅम्पियन बनल्यावर मोहम्मद सिराजचे मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, “नेटमध्ये बॉलिंग आणि खेळाडूंना पाणी देणे…”

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ भारतासाठी खास ठरले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येकी वेळी एक नवा मॅचविनर दिसला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (८ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये भारताने विजेतेपद जिंकताच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे विधान व्हायरल झाले आहे. त्याने यावेळी संघात अचानक संधी मिळाल्याचे आणि बाकावर बसल्याबद्दलचे त्याचे अनुभव सांगितले आहेत.

सिराज म्हणाला, “सर्व काही ईश्वराचे नियोजन आहे. मी तर संघाचा भागही नव्हतो, ईश्वराने संधी दिली आणि विश्वविजेता झालो.”

या स्पर्धेत सिराज केवळ एकच सामना खेळला आणि बाकीचे सामने तो बाकावरच होता. याबाबत निराश न होता बाकावर बसलेल्या खेळाडूंचेही महत्व संघासाठी किती फायद्याचे ठरते, याबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “बाहेर बसूनसुद्धा संघाच्या कामगिरीमध्ये मोठी भुमिका बजावता येते. जसे की खेळाडूंना पाणी देणे, नेटमध्ये गोलंदाजी करणे, संघाचे वातावरण चांगले ठेवणे आणि सर्वात आधी संघाचा विचार करणे. हे सर्व संघाच्या विजयात महत्वाचे ठरते. वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघासाठी दिलेले योगदान सर्वात महत्वाचे असते.”

सिराजच्या वरील प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विश्वविजेतेपद जिंकण्यासाठी मैदानाबाहेर राहुनही संघाला प्रोत्साहन देता येते, जेणेकरुन संघात सकारात्मकता राहील.

या स्पर्धेत सिराजला पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यूएसएविरुद्धच्या त्या सामन्यात तो भारताचा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. टीम कॉम्बिनेशनमुळे त्याला पुढील सामन्यांत संधी मिळाली नाही. त्याला हर्षित राणाच्या जागी संघात घेतले होते.

सिराज टी२० विश्वचषक २०२४च्या विजयी भारतीय संघाचाही भाग राहिला आहे. त्यामध्ये त्याने ३ सामने खेळले आणि एक विकेट घेतली होती. ही विकेट त्याने आयर्लंडविरुद्ध घेतली होती. तसेच तो पाकिस्तान आणि यूएसएविरुद्ध विकेट्स घेण्यात अपयशी ठरला, मात्र त्याने अधिक धावाही दिल्या नव्हत्या.

Comments are closed.