पहलगाम हल्ल्यापासून टॅरिफ, आत्मनिर्भर, समाज, श्रीलंका-बांगलादेशपर्यंत…; विजयादशमीच्या भाषणात


मोहन भगवत: अमेरिकेने जी टॅरिफ पॉलिसी अवलंबली आहे, ती स्वतःच्या हितासाठीची असेल. मात्र, आपण त्यावर अवलंबित होऊन जाणे योग्य नाही. जगाचा व्यवहार एकमेकांवर अवलंबूनच चालतो. कोणतेही राष्ट्र एकटे जगू शकत नाही. इतर देशांवरील अवलंबितता वाढत जाणे हे योग्य नाही. त्यासाठी स्वदेशी एक उपाय आहे. आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल, स्वदेशी स्वीकारावे लागेल, असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या सोहळ्यातून ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) देखील कार्यक्रमाला उपस्थित होते.

सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की,  आज 2 ऑक्टोबर स्वर्गीय महात्मा गांधी यांची जयंती आहे. स्वातंत्र्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. लालबहादुर शास्त्री यांची ही आज जयंती आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ झाला. भारतात श्रद्धा आणि ऐक्याची लाट निर्माण झाली. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. धर्म विचारून 26 पर्यटकांची हत्या केली. देशात रोष निर्माण झाला. सैन्य आणि सरकारने तयारी करून जोरदार उत्तर दिले. त्यात आपल्या नेतृत्वाची दृढता दिसून आली, असे म्हणत त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूरची नाव न घेता स्तुती केली.

कोणतेही राष्ट्र एकटे जगू शकत नाही : मोहन भागवत (Mohan bhagwat Speech)

सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, पहलगाम नंतरच्या कारवाईत आपले मित्र कोण-कोण आहे हे दिसून आले. तसेच आपल्या देशात असंविधानिक उपद्रवी कोण आहे? हे ही दिसून आले.  अमेरिकेने जी टॅरिफ पॉलिसी अवलंबली आहे, ती स्वतःच्या हितासाठीची असेल. मात्र, आपण त्यावर अवलंबित होऊन जाणे योग्य नाही. जगाचा व्यवहार एकमेकांवर अवलंबूनच चालतो. कोणतेही राष्ट्र एकटे जगू शकत नाही. इतर देशांवरील अवलंबितता वाढत जाणे हे योग्य नाही. त्यासाठी स्वदेशी एक उपाय आहे. आपल्याला आत्मनिर्भर बनावे लागेल, स्वदेशी स्वीकारावे लागेल. नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. हिमालयात आपण हे पाहत आहोत. भारताच्या शेजारील देश श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या ठिकाणी राजकीय असंतोष दिसून आले आहे. लोकांमध्ये सरकारच्या धोरणांमुळे असंतोष राहू शकतो, मात्र असंतोष अशा पद्धतीने व्यक्त होणे योग्य नाही, असे देखील त्यांनी म्हटले.

हिंसेने परिवर्तन होऊ शकत नाही : मोहन भागवत (Mohan bhagwat Speech)

लोकतांत्रिक मार्गातून योग्य परिवर्तन येऊ शकते, अशा हिंसेने परिवर्तन होऊ शकत नाही. काही बदल होतात. मात्र, परिस्थिती तशीच राहते. गेल्या काही दशकात अशा पद्धतीच्या बदलांमुळे, क्रांतीमुळे तिथली परिस्थिती बदललेली नाही परिवर्तन घडवण्याच्या प्रयत्नामुळे विदेशी शक्तींना हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. भारताच्या शेजारील असंतोष निर्माण झाला ते आपलेच आहेत. पूर्वी भारताचा भाग होते, असेही मोहन भागवत यांनी म्हटले. हिंदू समाज देशासाठी जबाबदार समाज आहे. हिंदू सर्वांना सामावून घेणारा समाज आहे.  हिंदू समाज बल संपन्न राहणे देशाच्या ऐक्यासाठी आवश्यक आहे. भारताला वैभव संपन्न व जगतील प्रमुख राष्ट्र बनविणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. त्यासाठी समाजाला संगठित करण्याचे काम संघ गेले शंभर वर्षापासून करत आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले.

संघाच्या विचारांमुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलो : रामनाथ कोविंद (Ramnath Kovind Speech)

रामनाथ कोविंद म्हणाले की, संघ देशातील सर्वात मोठे संघटन आहे. माझे जीवन घडवण्यात दोन डॉक्टरांचे महत्त्वाचे योगदान आहे. एक डॉक्टर हेडगेवार, एक डॉक्टर आंबेडकर. त्यांच्या विचारांमुळे मी देशातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकलो. शेतकऱ्यांपासून अंतराळ वीरपर्यंत आणि सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांना देशहिताशी जोडण्याचे काम संघ करत आहे. जगात वर्चस्व ठेवणारे किती तरी संघटन काळाच्या ओघात विलीन झाले, विसरले गेले, मात्र संघ कायम आहे, त्याचा सतत विस्तार होत आहे. संघात कोणतीही अस्पृश्यता आणि जाती भेद पाळले जात नाही. हे आजही अनेकांना माहीत नाही. त्यामुळे संघाबद्दलचे काही लोकांमधील हे गैरसमज दूर करण्याची गरज आहे. संघ नेहमीच सामाजिक सुधारणांचा पाठीराखा राहिला आहे. संघाचे स्वंयसेवक भारतीय परंपरांना, भारताच्या ऐक्याला महत्व देतात. संविधान सभेत बाबासाहेब यांनी अंतिम भाषणात काही मुद्द्यांबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यात जाती जातीतील दुफळी याबद्दल बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केली होती. तशीच (बाबासाहेबांसारखीच) काळजी मला संघाच्या चिंतनात ही दिसून येते. तरुणांमध्ये संघाबद्दलचे आकर्षण वाढत आहे. तरुणांना योग्य संस्कार देण्यामध्ये संघाचे योगदान महत्वाचे आहे. 2047  पर्यंत भारताच्या विकासात आणि विकसित भारत निर्माण करण्यात संघाचे मोठे योगदान राहील असा विश्वास असल्याचे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Nitesh Rane RSS: नितेश राणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेषात; संचलनातही सहभागी, PHOTO

आणखी वाचा

Comments are closed.