PSL बॉल टॅम्परिंग वादावर मोहसिन नक़वींची पहिली प्रतिक्रिया; PCB घेणार कडक ॲक्शन!
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) 2026 ची ‘पीएसएल’ यशस्वी करायची होती, पण सुरुवातीपासूनच ही स्पर्धा वादात सापडली आहे. रविवारी झालेल्या दोन मोठ्या घटनांमुळे पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक़वी (Mohsin Naqvi) प्रचंड नाराज झाले आहेत.
लाहोर कलंदर आणि कराची किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान लाहोरचा फलंदाज फखर जमान याने चेंडूशी छेडछाड (Ball Tampering) केल्याचा आरोप झाला आहे. मैदानावरील अंपायर फैसल आफ्रिदी यांनी फखरला असे करताना पाहिले, ज्यानंतर लाहोर कलंदर टीमला 5 धावांची पेनल्टी (दंड) ठोठावण्यात आली. फखर जमानने हे आरोप फेटाळले असले तरी, मॅच रेफरी रोशन महानामा आता यावर अंतिम निर्णय घेतील. या प्रकरणामुळे फखरवर बंदी येण्याची शक्यता आहे. या वादामुळे शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.
दुसरीकडे, सिकंदर रझाने बायो-बबल किंवा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत आपल्या नातेवाईकाला हॉटेलमध्ये बोलावले. पीसीबीच्या नियमांनुसार ही गंभीर चूक मानली जात असून त्याच्यावरही कारवाई होऊ शकते.
या प्रकरणांमुळे पीएसएलची प्रतिमा मलीन होत असल्याने पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक़वी चांगलेच आक्रमक झाले आहेत. हॉटेलमधील त्या घटनेमुळे मोहसिन नक़वी विशेषतः नाराज आहेत. पीसीबी हा इव्हेंट सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अगदी गद्दाफी स्टेडियमवरील सामन्यांसाठी प्रेक्षकांनाही बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंकडून होणारी ही शिस्तभंग खपवून घेतली जाणार नाही.
Comments are closed.