एक डुप्लांटिस… बारा विक्रम! पोल वॉल्टच्या सम्राटाने बाराव्यांदा मोडला स्वतःचाच विक्रम

पोल वॉल्ट खेळातील अनभिषिक्त सम्राट आणि दोन वेळचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या स्वीडनच्या आर्मंड ‘मोंडो’ डुप्लांटिस याने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. त्याने डायमंड लीगच्या स्टॉकहोम फेरीत 6.28 मीटर उंच उडी मारत स्वतःचाच विश्वविक्रम बाराव्यांदा मोडण्याचा पराक्रम केलाय.
25 वर्षीय डुप्लांटिसने हा विक्रम आपल्या देशातील प्रेक्षकांसमोर प्रथमच केला असून त्याच्या चेहऱयावर विक्रमानंतर आनंद ओसंडून वाहत होता. उडी यशस्वी होताच त्याने केलेला जल्लोष बघण्यासारखा होता. गेल्या सहा वर्षांत डुप्लांटिसने तब्बल 12 वेळा स्वतःच्या विश्वविक्रमात सुधारणा केली, हे विशेष.
डुप्लांटिसचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी तो आईच्या मायदेशासाठी म्हणजे स्वीडनसाठी खेळतो. विक्रमानंतर त्याने भावना व्यक्त करताना सांगितले की, ‘मी अत्यंत समाधानी आहे. स्टॉकहोममध्ये विश्वविक्रम बनवणं माझ्यासाठी खास आहे. माझ्या या सोनेरी कारकीर्दीत केवळ या गोष्टीचीच कमतरता वाटत होती.’
डुप्लांटिस पुढे म्हणाले, ‘या स्टेडियममध्ये मी पहिल्यांदा 11 वर्षांचा असताना उडी मारली होती. त्यावेळी जोरदार पाऊस आणि थंडी होती. मी चार मीटरपेक्षाही कमी उडी मारली होती, मात्र त्या वयासाठी ती खूप मोठी कामगिरी होती. आज मात्र या स्टेडियमवर माझं नाव कोरलं गेलं आहे.’ या विक्रमी क्षणाने केवळ डुप्लांटिसच्या कारकीर्दीला नव्हे, तर पोल वॉल्टच्या इतिहासालाही एक नवीन शिखर गाठून दिलं आहे.
Comments are closed.